लसीकरणाला अल्पप्रतिसाद
नरसी : आरोग्य विभागांतर्गत नरसी येथे लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत असली तरी नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. लसीबाबत ग्रामीण भागातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. विविध अफवाही पसरलेल्या आहेत. त्यामुळे लस घेण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
नरंगल येथे धूळ फवारणी
देगलूर : तालुक्यातील नरंगल येथे ग्रामपंचायतीच्या वतीने धूळ फवारणी करण्यात येत आहे. नरंगल गाव कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. गावात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. स्वच्छतेबाबत सरपंच शोभा करणे यांनी पुढाकार घेतला. गाव कोरोनामुक्त होण्यासाठी रवींद्र पाटील, शोभा करणे, अरविंदराव करणे, संतोषराव पाटील, उपसरपंच अश्विनी पाटील, शिल्पा पाटील, बालाजी पाटील, शोभा पाटील आदी पुढाकार घेत आहेत.
लसीकरण केंद्राचा शुभारंभ
लोहा : तालुक्यातील डोणवडा येथील लसीकरण केंद्राचा शुभारंभ सरपंच भगवान घोडके, उपसरपंच हणमंत जाधव यांच्या हस्ते मंगळवारी झाला. यावेळी माजी सरपंच बालाजी कदम, चेअरमन माधव कदम, आरोग्य कर्मचारी एस.एच. कहाळेकर, अजहरा खान, एस.बी. टोमके, कोमल कांबळे, कोमल कउटवार आदींची उपस्थिती होती. लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.
दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
नायगाव : येथे पोलिसांनी छापे टाकून अवैध देशी दारूसह दोन ऑटो व एक दुचाकी असा एकूण दीड लाखांचा ऐवज जप्त केला आहे. चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक बाचावार यांनी तीन ठिकाणी छापे मारून पाच हजारांची देशी दारूसह उपरोक्त प्रमाणे ऐवज जप्त केला.
९० लाखांची तरतूद
नायगाव : तालुक्यातील नळ योजनेच्या कामांसाठी ९० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. २०१९-२० या वर्षीही तालुक्यातील २१ गावात दोन कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. पाणीपुरवठा नायगाव उपविभागाच्या देखरेखीखाली ही कामे झाली होती.
ग्रामीण भागात पुन्हा चुली
उमरी : घरगुती गॅस दर वाढल्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्या आहेत. महागाई वाढली. शासनाने दारिद्र्यरेषेखालील लोकांना गॅस दिले होते. गॅसच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे ग्रामीण भागात चुली पेटलेल्या दिसत आहेत.
उंचेगाव येथे लसीकरण
हदगाव : तालुक्यातील उंचेगाव बु. येथे लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात २२५ जणांचे लसीकरण करण्यात आले. यापूर्वी तीन टप्प्यात २४१ जणांचे लसीकरण झाले होते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपसरपंच राजेश्वरराव देशमुख, सदस्य देवराव देशमुख यांनी मोहीम राबवून आरोग्य विभागाला सहकार्य केले. आरोग्य विभागाकडून डॉ. बेले, बेग, ललिता देशमुख, शकुंतला पतंगे, पंचफुला जमदाडे यांनी काम केले.
सिटीस्कॅन, एक्स-रे मशीन बंद
देगलूर : येथील उपजिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन व एक्स-रे मशीन बंद असल्याने कोरोना संशयित रुग्णांचे हाल होत आहेत. देगलूर, बिलोली, मुखेड परिसरातील रुग्णांना सिटी स्कॅनसाठी नांदेड, उदगीर, निजामाबाद, हैदराबाद येथे जावे लागत आहे. या संदर्भात संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
पीककर्ज वाटप
माहूर : खरीप २०२०-२१ मध्ये भारतीय स्टेट बँक शाखा माहूरने दोन हजार ३०० शेतकऱ्यांना एप्रिलअखेरपर्यंत १३ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केल्याची माहिती शाखाधिकारी अविनाश कुमार यांनी दिली. सुमारे सहा हजार ५०० शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये पाच हजार ५०० शेतकऱ्यांचे महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतून शासनाकडील रक्कम खात्यामध्ये जमा झाली आहे.
ज्वारीचे उत्पादन समाधानकारक
हिमायतनगर : तालुक्यात रबी पिकांसह उन्हाळी हंगामातील ज्वारी, तीळ, टाळकी ज्वारी, हरभरा, गहू पिके चांगलीच बहरून आली आहेत, अशी माहिती ज्येष्ठ शेतकरी मारोतराव पाटील यांनी दिली. ज्वारीबरोबर जनावरांना चाराही मिळाला आहे. २०२१-२२ पावसाळी हंगामात कपाशीचा पेरा कमी करून हळद पिकाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता पाटील यांनी व्यक्त केली.