नांदेड - विष्णुपूरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या ४८ तासात ३१ हुन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतू त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही. मंगळवारी सकाळी अनेक रुग्णांना सलाईन, सिरींज त्यानंतर सर्प दंशाची औषधी, रेबीज यासारखी औषधीही बाहेरुन घेवून येण्याची वेळ आली होती.
प्रशासनाकडून रुग्णालयात औषधांचा मुबलक साठा असल्याचा दावा वारंवार करण्यात येत आहे. परंतू प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. १० ते २० रुपयांना मिळणारे सलाईनही रुग्णांना बाहेरुन आणावे लागत आहे. त्यासाठी एका छोट्या आकाराच्या चिठ्ठीवर डॉक्टरांकडून प्रिस्कीप्शन लिहून दिले जात आहे. त्यामुळे मृत्यूच्या या तांडवानंतरही शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा अद्यापही व्हेंटीलेटवर असल्याचे दिसून येते.