नांदेड : नाटक हे फक्त मनोरंजनाचे माध्यम नाही तर ते समाज प्रबोधनाचेही माध्यम आहे. अनेक नामवंत लेखक, रंगकर्मींनी नाटकातून समाजप्रबोधनाचे धडे दिले आहेत़ आणि या माध्यमातून त्या-त्या वेळच्या समस्या, अडचणींवर मात करण्याचे बळ दिले़ याचा सकारात्मक प्रतिसादही दिसत आला आहे. काळानुरूप लोकांचे विचार बदलले असले तरी आपल्या आजूबाजूस नवीन वेगवेगळ्या समस्या, प्रश्न उभे राहतात़ या प्रश्नावरही नाटकाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे जनजागृती करता येऊ शकते, हे माणसाळलेली रात्र या नाटकाने दाखवून दिले़ अवयवदानाविषयी संदेश त्यांनी दिला़
परभणीच्या प्रबोधन सेवाभावी संस्थेने सादर केलेले हे नाटक उदय कातनेश्वरकर यांनी लिहिलेले असन अनुजा डावरे यांनी दिग्दर्शित केले आहे़ हे संपूर्ण नाटक एका स्मशानभूमीत घडते़ स्मशानभूमीतील मसणजोगी (उदय कातनेश्वरकर ) याच्याशी विविध आत्मे थेट बोलत असतात. त्या ठिकाणी एक भुरटाचोर बाबल्या (भरड क्षिप्रसाधन) येतो़ त्याला स्मशानभूमीत जळत असलेल्या एका शवावरील दागिना लांबवायचा असतो़ या चोराचा भाऊ अपंग असतो़ त्याच्या दवाखान्यासाठी त्याला पैसे हवे असतात़ परंतु ज्याच्यासाठी त्याला पैसे हवे असतात, तो मयत झालेला असतो याची या चोराला माहीती नसते.
दरम्यान याच स्मशानभूमीत कार अपघातात मयत झालेली निलू (ऐश्वर्या डावरे) येते़ या निलून९ आपले स्वत:चे अवयव दान केलेले असतात. अशा पद्धतीने स्मशानभूमीत मसनजोग्यासह भुरटा चोर बाबल्या आणि मयत निलू एकत्र येतात़ या तिघांचेही विचार अतिशय भिन्न असतात़ मसनजोग्यास माणूस खूप दुष्ट आहे असे वाटत असते़ तर बाबल्याचा माणसावर विश्वास असतो़ तर निलूचे मत आणखीनच वेगळे असते़ माणूस कसाही असो, आपण आपल्या पद्धतीने चांगला विचार केला पाहिजे अशी ती सांगत असते़ या तिघांतील याच विषयावरील चर्चेतून मसनजोग्याचेही मत परिवर्तित होते़
संपूर्ण नाटकात दिग्दर्शकाचे काम उठून दिसते़ ऋग्वेद कुलकर्णी या बाल कलावंताने साकारलेली भूमिकाही लक्षवेधी ठरली आहे़ तर भरड क्षिप्रसाधन, उदय कातनेश्वरकर, ऐश्वर्या डावरे, संकेत पांडे यांनीही आपआपल्या भूमिकेस न्याय दिला आहे़ नाटकाचे नेपथ्य संकेत पांडे आणि संजय कातनेश्वरकर यांनी साकारले तर दिगंबर दिवाण यांची प्रकाश योजना सत्याचा आभास निर्माण करणारी होती. उषाताई डावरे यांनी रंगभूषा व वेशभूषेची बाजू सांभाळली तर संगीत उपेंद्र दुधगावकर आणि मंदार कातनेश्वरकर यांनी साकारले़ दरम्यान, २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सरस्वती प्रतिष्टान, नांदेडच्या वतीने राजेंद्र पोळ लिखित, सुहास देशपांडे दिग्दर्शित वारूळ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.