लोकमत न्यूज नेटवर्क, नांदेड : उद्धव ठाकरे यांना कोणीही धोका दिला नाही. सत्तेसाठी ते काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. निवडणुकीआधी त्यांच्याशी झालेल्या चर्चेत बहुमत मिळाल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री राहतील, असे ठरविले होते. परंतु, निकाल हाती येताच त्यांनी धोका देऊन काँग्रेस अन् राष्ट्रवादीशी जवळीक केली, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केली.
भारतीय जनता पार्टीच्या महाजनसंपर्क अभियानांतर्गत शाह यांची नांदेड शहरात शनिवारी सायंकाळी सभा झाली. मोदी सरकारचे हे नववे वर्ष भारत गौरव, भारत उत्कर्ष, गरीब कल्याण, सुरक्षित भारत असे आहे. काँग्रेसकडून राम मंदिर वही बनायेंगे, मगर तारीख नही बतायेंगे...अशा अफवा पसरविण्यात येत होती. परंतु, मोदींनी देशातील संस्कृती आणि इतिहासाचा सन्मान केला असून, २०२४ मध्ये प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर अयोध्येत उभे राहत आहे, असेही शाह म्हणाले.
विदेशात देशाच्या विरोधात बोलू नये याचे भानही राहुल गांधींना नाही. त्यांना ही बाब माहीत नसेल तर त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांचा सल्ला घ्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी मंचावर केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री अतुल सावे, खा. प्रतापराव चिखलीकर, खा. सुधाकर श्रृंगारे उपस्थित होते.
धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, त्यामुळे मुस्लीम आरक्षण असंवैधानिक आहे. देशात लवकरच समान नागरी कायदा लागू करण्यात येईल. - अमित शाह , केंद्रीय गृहमंत्री
शरद पवार यांना सत्तेत नसताना ओबीसी, मुस्लीम, ख्रिश्चन यांची चिंता वाटते. महाराष्ट्राला पेटविण्याचे काम पवार करीत आहेत. त्यामुळे हे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे. - चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष