नांदेडवर वर्चस्वाची लढाई; प्रताप पाटील चिखलीकरांच्या हाती पुन्हा घड्याळ, लागलीच उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 11:43 AM2024-10-25T11:43:32+5:302024-10-25T11:46:00+5:30
काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप असा राजकीय प्रवास करत प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना लागलीच लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे.
कंधार : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना नांदेडमध्ये मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. भाजपचे नांदेडचे माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करत मतदारसंघावर पुन्हा पकड मिळवण्यासाठी तब्बल १२ वर्षांनंतर चिखलीकरांनी दुसऱ्यांदा बांधली हातात घड्याळ.
काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप असा राजकीय प्रवास करत चिखलीकर यांनी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून दोन वेळेस प्रतिनिधित्व देखील केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा-कंधार मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मतदारसंघात त्यांनी तयारी देखील सुरु केली होती. हा मतदारसंघ भाजपाला सुटेल अशी शक्यता होती, मात्र ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला सुटली आहे. तेव्हा माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने भाजपला धक्का बसला असून नांदेडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
माजी खासदार श्री. प्रतापराव चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची भक्कम साथ लाभेल, याची खात्री आहे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. pic.twitter.com/vLwIjJYe9R
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 25, 2024
चिखलीकरांची घरवापसी
चिखलीकरांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासात पक्षांतराचा विषय हा नेहमीच चर्चेचा राहिला आहे. ते मूळ काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये असताना त्यांनी विविध पदांवर काम केले. काँग्रेस सोडून ते लोकभारती पक्षात गेले. 'लोकभारती' मध्ये ते आमदार झाले. त्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २ वर्षांनंतर त्यांनी २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही. या पक्षात काही वर्षें काम केल्यानंतर २०१९ च्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपच्या उमेदवारीवर ते नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रताप पाटील चिखलीकर यांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात मैदानात उतरवले होते. मोठ्या मताधिक्याने चिखलीकर यांनी चव्हाण यांचा पराभव केला होता. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करत मतदारसंघावर पुन्हा पकड मिळवण्यासाठी तब्बल १२ वर्षांनंतर चिखलीकरांनी दुसऱ्यांदा हातात घड्याळ बांधली आहे. आता ही घड्याळ त्यांच्या हातात किती दिवस राहणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पुन्हा चव्हाण - चिखलीकर संघर्ष
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याने खासदार प्रतापराव चिखलीकर या कट्टर विरोधकांची तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा मैत्री जुळू लागली होती. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र तर कायमचा शत्रू नसतो, असाच अनुभव नांदेडकर अनुभवताना असताना एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात मिनोमिलन झाल्याने एकाच फ्रेममध्ये दिसू लागले होते. नांदेड जिल्ह्यात भाजपाची ताकद दुपटीने वाढेल असे संकेत मिळत असतानाच काही काळातच पुन्हा एकमेकांचे कट्टर विरोधक होणार असल्याचे शुक्रवारी झालेल्या चिखलीकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने दिसून येते.