माेबाईलच्या क्रांतीत इंटरनेटचाही वापर वाढला आहे. प्रत्येक जण इंटरनेटच्या माध्यमातून या ना त्या क्षेत्रातील ज्ञान मिळवत आहे. साेशल मीडियाही हे एक महत्त्वाचे माध्यम ठरले असून साेशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. साेशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार नित्याचेच झाले आहे.
सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून
साेशल मीडियामध्ये आता सध्या सर्वाधिक वापर फेसबुक, व्हाॅट्सॲप, ट्विटर, इंस्टाग्राम या माध्यमांचा हाेत आहे. फेसबुकद्वारे फसवणुकीच्या अनेक तक्रारी येत असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे.
अशी घ्या काळजी
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एखाद्या अनाेळखी व्यक्तीने शेअर केलेली पाेस्ट खात्री न करता लाईक अथवा फाॅरवर्ड करणे टाळावे.
धार्मिक भावना दुखावणाऱ्या पाेस्टकडेही काळजीपूर्वक पाहावे. साेशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या लिंक्स उघडणे टाळणे सर्वांच्याच हिताचे आहे. अशा लिंकच्या माध्यमातून बॅंक खाते रिकामे हाेत आहे.
वर्षभरात दहा गुन्हे
जिल्हाभरात विविध कारणांतून सोशल मीडियावर झालेली बदनामी व अन्य कारणांनी दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत अनेक नागरिक पुढे येत नाहीत.
पाेलिसांच्या सायबर विभागाकडे जवळपास १०० वर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दहा गुन्हे दाखल झाले असून त्यांचा तपास सुरू आहे.
मुलींनो डीपी सांभाळा
साेशल मीडियाचा वापर मुलांसह मुलीही करत आहेत. अशा वेळी डीपीसह प्राेफाईल लाॅक करणे गरजेचे आहे. ते न केल्यास डीपीचा गैरवापरही हाेऊ शकताे.
मुलींच्या साेशल मीडियाच्या वापराबाबत कुटुंबीयांनीही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या लिंक्स साेशल मीडियाच्या माध्यमातून येत आहेत. त्या उघडू नयेत.
हा मार्ग निवडावा
साेशल मिडीयावर एखाद्या ग्रुपमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणार तसेच वैयक्तिक टीका-टिपणी करणारा मजकूर लाईक अथवा शेअर करू नये. बदनामी करणारा मजकूर पुढे पाठवल्यास व त्यात दोषी आढळल्यास ६ महिने ते ३ वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.