नांदेड : ज्या पक्षाने आपल्याला सर्वकाही दिले आहे़ त्या पक्षाबद्दल प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकाऱ्याने निष्ठा बाळगायला हवी़ पक्षामधून कोणी जात असेल तर, त्यांचे खुशाल स्वागत आहे. परंतु, नव्या व जुन्या पक्षाच्या निष्ठावंतांनी दलबदलूंना महत्त्व देवू नका, असे आवाहन माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी केले़ या बैठकीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी दलबदलूंवर संताप व्यक्त केला़
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील कार्यकर्ता व पदाधिकारी यांची बैठक शुक्रवारी भाग्यनगर येथे घेण्यात आली. यावेळी कदम बोलत होते. ते म्हणाले, जे कोणी पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत़ त्याबद्दल आपले काही म्हणणे नसून कदाचित त्यांनी बॅगा भरून घेतल्या असतील. जे जात आहेत त्यांचे स्वागत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या ४० वर्षांच्या काळामध्ये अनेक जणांना मोठे केले. त्याग आणि त्यांची निष्ठा आम्ही कदापि विसरू शकत नाही. पवार यांना कोणीही संपवू शकत नाही. कॉंग्रेससोबत विधानसभेसाठीे आघाडी आहे. कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पक्षावर निष्ठा ठेवावी. जे कोणी पक्षावर निष्ठा ठेवत नाही इतर पक्षामध्ये जावून पक्षांतराची भाषा करतात़ अशा दलबदलूंच्या विचारांना स्थान देवू नका. त्यांच्याकडे इतर पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात आले़ या बैठकीमध्ये पक्षाचा ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोण असावा यासंदर्भात चर्चा झाली. जिल्हाध्यक्षपदाची धुरा माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी सांभाळावी असा ठराव संतोष देशमुख यांनी मांडला. या ठरावाला माजी आ.शंकरअण्णा धोंडगे, आ. प्रदीप नाईक यांनी अनुमोदन दिले. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या तक्रारी केल्या़
माझ्याबद्दल गैरसमज पसरवला जात आहे. मी पक्षाशी एकनिष्ठ राहणार आहे. कमलबाबू यांनी जिल्ह्याची धुरा सांभाळावी मी त्यांच्या पाठीशी आहे. -गंगाधरराव कुंटूरकर, माजी मंत्री
मला जिल्ह्याच्या राजकारणामध्ये फारसा सहभाग यापूर्वी काही जणांनी घेवू दिला नाही. मी केवळ माझ्या विधानसभा मतदारसंघापुरता विचार करत होतो. आता जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपण अधिक सक्रिय होणार आहे. अण्णा भाऊ साठे कर्ज प्रकरणात कुठलाही घोटाळा झाला नाही.माझ्याविरुद्ध हे षड्यंत्र आहे़ - आ़प्रदीप नाईक
गोरठेकर यांनी पक्ष सोडला हे बरे झाले. आता जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला चांगले दिवस येतील़ -शंकर धोंडगे, माजी आमदार
मी महायुतीचा जिल्हा बँकेमध्ये संचालक आहे. मला बँकेचे अध्यक्षपद त्यांच्यामुळे मिळाले. जिल्हा बँकेचा अध्यक्ष असल्यामुळे चिखली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला. अद्यापही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आहे. मी पक्षातच राहणार आहे़ - डॉ़सुनील कदम, शहर जिल्हाध्यक्ष