नांदेड : वसरणी भागातील शासकीय दूध डेअरीची तीन हजार लिटर दूध संकलनाची क्षमता असून त्यापेक्षा अधिक दूध आल्यास ते घेण्यास नकार देण्यात येत आहे़ त्यामुळे संतप्त झालेल्या शेतक-यांनी दूध डेअरीच्या प्रवेशद्वारावरच शेकडो लिटर दूध रस्त्यावर ओतून निषेध नोंदविला़ दररोज अशाप्रकारे दूध संकलनास नकार मिळत असल्यामुळे शेतक-यांनी संताप व्यक्त केला़नांदेडच्या शासकीय दूध डेअरीत उस्माननगर, करडखेड, नर्सी आणि लोहा परिसरातून दररोज शेतकरी मोठ्या प्रमाणात दूध घेवून येतात़ नांदेड जिल्ह्यासाठी डेअरीला दररोज तीन हजार लिटर दूध संकलन करण्याची क्षमता आहे़ त्यापेक्षा अधिकचे आलेले दूध स्वीकारु नये असे आदेश देण्यात आले आहेत़ त्यात एकट्या टेळकीसारख्या गावातून किमान दोन हजारांवर लिटर दूध संकलित होते़ गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळ असल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळला आहे़ परंतु, शासकीय दूध डेअरीच्या दूध संकलनाची क्षमता वाढविण्यात आली नसल्यामुळे मोठी गोची झाली आहे़ शुक्रवारी सुनील हंबर्डे यांच्यासह अनेक शेतकरी डेअरीत दूध घेवून आले़ परंतु, अतिरिक्त दूध घेणार नसल्याचे स्पष्ट केले़ त्यामुळे संतप्त शेतकºयांनी डेअरीच्या रस्त्यावरच दूध ओतून शासनाचा निषेध नोंदविला़क्षमतेएवढे दूध संकलन
- शासकीय दूध डेअरीची दूध संकलन करण्याची क्षमता ही ३ हजार लिटर एवढी आहे़ त्यापेक्षा जास्तीचे दूध संकलित करु नये असे वरिष्ठ कार्यालयांकडून आदेश आहेत़ त्यामुळे आम्हाला ३ हजार लिटरपेक्षा अधिकचे दूध संकलित करता येत नसल्याची माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी दिली़
- शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुरु केला़परंतु, आता शासकीय दूध डेअरीकडून आमचे दूध घेतले जात नाही़ शेजारील परभणी जिल्ह्यात ५० हजार लिटर दूध संकलित केले जाते़ तर नांदेडात फक्त ३ हजार लिटर आहे़ त्यामुळे आणलेले दूध आम्हाला रस्त्यावर फेकावे लागले असून शेतकºयांनी आत्महत्याच कराव्यात का? असा प्रश्न सुनील हंबर्डे यांनी केला़