घरगुती कारणावरून एकास मारहाण
नांदेड- नल्लागुट्टा चाळ येथील एका व्यक्तीने संगनमत करून एका व्यक्तीस तू माझ्या बहिणीस का नांदवत नाहीस, म्हणत शिवीगाळ केली व त्यानंतर धक्काबुक्की करत फायटरने मारहाण करून दात पाडून गंभीर दुखापत केली. सोबतच जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. नसिरखाँ चाँदखा (२४) यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गौर करीत आहेत.
पैशासाठी विवाहितेचा मानसिक छळ
नांदेड- वेल्डिंगचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये, म्हणून जिल्ह्यातील वाजेगाव येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीस उपाशी ठेवत तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी २६ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चंचलवाड पुढील तपास करीत आहेत.
हदगाव, कुंटूर येथे जुगार अड्ड्यावर छापे
नांदेड- हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोळी येथे विनापरवाना अंदर-बाहर जुगार खेळताना व खेळविताना नगदी एक हजार ४५० रुपये व जुगाराचे साहित्य मिळून आले. हदगावच्या घटनेत पोलीस उपनिरीक्षक दीपक कल्याण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे सोमठाणा ते काेलंबीकडे जाणाऱ्या पुलाजवळ विनापरवाना तिर्रट नावाचा जुगार खेळताना व खेळविताना १४ हजार २०० रुपये व इतर साहित्य असे ४० हजार रुपये किमतीचे साहित्य मिळून आले. सहायक पोलीस निरीक्षक करीम खान यांच्या तक्रारीवरून कुंटूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरून दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हे
नांदेड- धनेगाव परिसरात एका झाडाखाली विनापरवाना देशी दारू विक्री करताना १४ हजार ४०० रुपयांचा माल आढळून आला. पोलीस पद्मसिंह कांबळे यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे नायगाव तालुक्यातील नगरपंचायत समिती येथे दोन हजार ४९६ रुपयांची देशी दारू, एक अल्फा ऑटोरिक्षा (एमएच २६ एएन ७१२३) किंमत ५० हजार रुपये असा ५२ हजार ४९६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, निवघा बाजार ते सिरड रोडवरील जय अंबा धाबा येथे विनापरवाना विदेशी दारू किंमत तीन हजार ६१० रुपयांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.