नांदेड: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या वतीने संघाचे सरसंघचालक माधव गोळवलकर तथा श्री गुरुजी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा श्री गुरुजी पुरस्कार यंदा पुण्याचे डॉ. गोरक्ष बंडा महाराज देगलूरकर यांना वाङमय क्षेत्रात आणि मध्यप्रदेशच्या श्रीमती भारती ठाकूर यांना सेवा क्षेत्रात देण्यात येणार आहे, अशी माहिती जनकल्याण समितीचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी दिली.
जनकल्याण समितीच्या वतीने १९९६ पासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना श्री गुरुजी पुरस्काराने गौरविण्यात येते. विविध दहा क्षेत्रातील पाच गटात हे पुरस्कार देण्यात येतात. दरवर्षी एका गटातील दोन पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यावर्षी वाङमय आणि सेवा क्षेत्रासाठी पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
नांदेडमध्ये ३ मार्च रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी अतुल कोठारी हे प्रमुख वक्ते राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून अजितकुमार मेहेर हे राहतील. वाङमय क्षेत्रातील कार्याबद्दल पुणे येथील डॉ. गोरक्ष बंडा महाराज देगलूरकर यांना गौरविण्यात येणार आहे. भारतीय संस्कृतीचा श्रेष्ठ वारसा, मंदिराचे कालजयी व विलोभणीय स्थापत्य तसेच मूर्तीशिल्प यांचे अलौकीतत्व या विषयावर संशोधन भाषणे तसेच अनेक पुस्तकाच्या लेखनातून ते परिचित आहेत.
सेवा क्षेत्रात श्री गुरुजी पुरस्कार घोषित झालेल्या श्रीमती भारती ठाकूर मध्यप्रदेशातील लेपा ता. कसरावद जि. खरगोण यांनी तरुण वयातच केंद्र सरकारची सेवा व सुखी जीवनाचा त्याग करुन गोलाघाट, आसाम भागात विवेकानंद केंद्राच्या वतीने शिक्षीका म्हणून कार्यरत आहेत. निमार अभ्युदय रुरल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून वसतिगृह, गोशाळा, शिवणकेंद्र या माध्यमातून स्थानिकांना रोजगार व प्रशिक्षण दिले आहे. यावेळी अरुण डंके, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. सुधीर कोकरे, अजितकुमार मेहेरे, डॉ. प्रकाश पोपशेटवार आदींची उपस्थिती होती.