नांदेड : राज्य शासनाच्या वतीने १३ हजार तरुणांची मेगा पोलिस भरती घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले़ प्रत्यक्षात जाहिरात निघाली ती तीन हजार पोलिसांच्या भरतीसाठी़ हा प्रकार पाहून मागील अनेक दिवसांपासून भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांचा संताप अनावर झाला़ या तरुणांनी कुठल्याही नेतृत्वाविना शनिवारी एकत्रित येवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे आपला संताप व्यक्त केला़
राज्य शासनाच्या वतीने पोलिस दलात १३ हजार तरुणांची मेगा भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले होते़ या अनुषंगाने अनेक तरुणांनी पोलिस भरतीची तयारी सुरू केली होती़ प्रत्यक्षात अवघ्या तीन हजार पदांसाठीच ही भरती होणार असल्याचे याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर स्पष्ट झाले़ त्यामुळे मागील काही वर्षापासून या भरतीच्या अनुषंगाने तयारी करणाऱ्या तरुणातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या़ शनिवारी या तरुणांनी एकत्रित येवून शहरातून मोर्चा काढला़ जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली़ त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले़ राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे १३ हजार पदांची भरती करावी, तरुणाईच्या मनात महापरीक्षा पोर्टलबद्दल प्रचंड नाराजी आहे, या नव्या पद्धतीमुळे होतकरू आणि गुणवंत विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करीत महापोर्टलवरील परीक्षा बंद करून जुन्या आॅफलाईन पद्धतीनेच परीक्षा घ्यावी अशी मागणी करण्यात आली़ पोलिस भरतीची लेखी परीक्षा महापरीक्षा पोर्टलमार्फत आॅनलाईन न घेता त्या त्या जिल्ह्यांच्या पोलिस घटकामार्फत एकाच दिवशी आॅफलाईन पद्धतीने परीक्षा घ्यावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली़ याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली ७२ हजार पदांची मेगा भरतीही तातडीने सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले़ या निवेदनावर सोपान देवकत्ते, महेंद्र देवगुंडे, अभिमन्यू तरंगे, भगवान वाघमारे यांच्यासह परीक्षार्थी तरुणांच्या स्वाक्षऱ्या आहेत़
संपूर्ण ३६ जिल्ह्यात भरती सुरू करा३ हजारांऐवजी १३ हजार पदांची पोलिस भरती करावी तसेच महापरीक्षा पोर्टल रद्द करून आॅफलाईन पद्धतीने परीक्षा घ्यावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे़ याबरोबरच ७२ हजार पदांची मेगा भरतीही तात्काळ सुरू करावी, जिल्हा परिषद तसेच इतर विभागातील भरतीच्या कार्यवाहीला वेग द्यावा, तलाठी व अन्य परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करावी, पोलिस शिपायासह तलाठी, लिपिक आणि सहाय्यक या वर्ग ३ आणि ४ मध्ये येणाऱ्या सर्व पदांची भरती राज्य पातळीवर राज्य आयोग नेमून त्यांच्यामार्फत करावी आणि मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यात पोलिस भरती सुरू करावी अशा आमच्या मागण्या असल्याचे सोपान देवकत्ते यांनी सांगितले़