माहूर (जि. नांदेड) : निजामकाळात विभागीय राजधानी म्हणून माहूर शहर राहिलले आहे. येथील राजे उदाराम राजघराण्यातील मयताच्या पुरातन समाधीची मोडतोड व नासधूस केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुप्तधनाच्या शोधासाठी काही समाजकंटकांनी हा प्रकार केल्याचा संशय असून, याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणारी तक्रार राजे उदाराम राजघराण्याचे वंशज राजे विनायक सुधाकर देशमुख यांनी माहूर पोलीस ठाण्यात केली आहे.
माहूर शहर निजामकालीन राजे उदाराम घराण्याचे अधिकारक्षेत्र राहिलेले आहे. शूरवीर महाराणी रायबागन, गोंड राजा आदीसह निजाम काळातील काही सरदारांचा इलाका व राजभवन असलेला भाग म्हणून इतिहासात या शहराची ओळख आहे. या भागात आजही राजघराण्याच्या निवासस्थानाचे पुरावे सापडतात. दत्तशिखर संस्थानने राजघराण्यातील व्यक्तीचा मरणोपरांत योग्य सन्मान राखला जावा या उद्दात हेतूने मातृतीर्थ तलाव रोडलगत कपिले महाराज यांचा मठ असलेल्या ठिकाणी राजघराण्यातील मयत व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्यासाठी व समाधी बांधण्यासाठी तोंडी आशीर्वादपर बिदागी म्हणून ही जागा दिलेली आहे. सदर ठिकाणी वर्षानुवर्षे राजघराण्यातील मयताचे अंत्यसंस्कार केले जात असून, परिसरातच समाधी बांधली जाते. त्यामुळे या भागात खोदकाम केले तर तेथे गुप्तधन मिळेल असा काहींचा होरा असतो.
सध्या कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. याचाच फायदा घेत काहीजणांनी माहूर येथील राजे उदाराम राजघराण्यातील मयताच्या समाधीची मोडतोड व नासधूस केली. तसेच या परिसरात खोदकाम करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. खोदकाम केलेल्या ठिकाणी काटेरी झाडाच्या फांद्या टाकून पलायन केल्याचेही निदर्शनास आले आहे. या प्रकाराबाबत राजे उदाराम राजघराण्याचे वंशज राजे विनायक सुधाकर देशमुख यांनी माहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, संबंधितांविरुध्द कारवाई करुन राजघराण्याला न्याय देण्याची मागणी केली आहे.
गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्याचा संशयमाहूर शहरात यापूर्वीही लेंढाळा तलावा शेजारी गुप्तधन सापडल्याने माहूर पोलीस स्टेशनमध्ये मोठी कारवाई झाली होती़ गुप्तधन शोधण्यासाठी मांडूळ जातीच्या दुतोंडी सापाची तस्करी वनविभागाने पकडल्याच्या काही घटनांच्या नोंदी माहूर वनविभागाच्या दप्तरी आहेत. त्यातच राजे देशमुखांनी पोलीस ठाण्यात दिलेले निवेदन पाहता गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रीय झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.