नांदेड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सोमेश्वर येथे शुक्रवारी एका नववीतील विद्यार्थिनीने आजोबाच्या धोतराने गळफास घेतला होता. या घटनेला २४ तास उलटले तोच हडको येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दोन दिवसांत जिल्ह्यात आरक्षणासाठी दोघांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात तरुणांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. मनोज जरांगे पाटील यांनी तरुणांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन केले आहे. त्यानंतरही आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढच होत आहे. गुरुवारी रात्री सोमेश्वर येथील कोमल बोकारे या विद्यार्थिनीने चिठ्ठी लिहून गळफास घेतला होता. कोमलचा गावात सुरू असलेल्या साखळी उपोषणातही सहभाग होता.
या घटनेमुळे सोमेश्वर गावावर शोककळा पसरली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी हडको भागातील साईनाथ व्यंकटी टरके या ३० वर्षांच्या तरुणाने गळफास घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनात साईनाथचा सक्रिय सहभाग होता. परंतु आरक्षण मिळत नसल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. घटनेनंतर मराठा समाजातील अनेकांनी टरके यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले.