नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठांतर्गत ‘बॅचलर ऑफ जर्नालिझम’ या पदवी अभ्यासक्रमासाठी २९ जून रोजी मुद्रित माध्यमाची परीक्षा होती. या परीक्षेला विद्यार्थी उपस्थित राहिले. उत्तरपत्रिकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर स्वतःचे नाव व परीक्षा क्रमांक कधी टाकला म्हणत परीक्षा रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. २९ जून रोजी हा प्रकार घडल्यामुळे विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पदवी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकात त्यांनी अनेकवेळा बदल केले आहेत. सुरुवातीला जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २१ जून रोजी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आले, तेव्हा सुधारित वेळापत्रक विद्यार्थ्यांना देऊन २८ जूनपासून परीक्षा सुरू होतील, असे सांगण्यात आले. या वेळापत्रकानुसार २९ जून रोजी मुद्रित माध्यमाची परीक्षा होती. विद्यार्थी परीक्षेसाठी हॉलमध्ये उपस्थित झाले. त्यांना उत्तरपत्रिका देण्यात आल्या आणि अचानक प्रश्नपत्रिका देण्याऐवजी परीक्षा रद्द झाल्याचे सांगून नवीन वेळापत्रक जाहीर केल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. दुसऱ्यांदा वेळापत्रक रद्द करून आता तिसरे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या या गोंधळामुळे विद्यार्थी मात्र संभ्रमात आहेत.
दरम्यान, तिसऱ्या नवीन वेळापत्रकानुसार १३ जुलै रोजी ‘मीडिया मॅनेजमेंट’ या विषयाची परीक्षा होणार आहे. मात्र, याचदिवशी बहिस्थ विद्यार्थ्यांची एम. ए. समाजशास्त्र विषयाची परीक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे २८ जून रोजी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या सर्व प्रकारावर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा केंद्र प्रमुखांकडे धाव घेतली आहे. वैजनाथ माने, आनंद सोळुंके, सौरभ दौंड, शिवाजी एडके, मदत डोंगरे, अक्षय मुंडे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रप्रमुख यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांची झालेली अडचण त्यांच्या निदर्शनास आणून दिली.