जि. प. उपाध्यक्षांची भेट
उमरी - सिंधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मा रेड्डी व आकाश रेड्डी यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष पेरेवार, तालुका आरोग्य अधिकारी मोहन देवरावे, वैद्यकीय अधिकारी कस्तुरे व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
वटपौर्णिमेनिमित्त रोपाचे वाटप
कंधार - भाजप महिला मोर्चाच्यावतीने वृक्षारोपण व महिलांना वटवृक्षाचे वाटप करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी वृक्षारोपण केले. यावेळी जि. प. सदस्या प्रणीता देवरे, प्रदेश सरचिटणीस सविता कुलकर्णी, शैला मोळके, जिल्हाध्यक्षा चित्रा गोरे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महिला मोर्चा कंधार तालुकाध्यक्षा जयमंगल औरादकर, वंदना डुमणे, सुनंदा वंजे, कल्पना गीते, कल्पना कागणे, मीना मुखेडकर, शोभा ठाकूर, स्मिता वडवणे, सुरेखा वडवळकर यांनी परिश्रम घेतले.
पाटील यांच्याकडून दर्शन
माहूर - जलसंपदामंत्री जयंत पाटील माहूर दौऱ्यावर होते. त्यांनी रेणुका देवी मंदिराच्या पायरीवर देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर दत्तशिखर संस्थानला भेट दिली. शिखर संस्थानचे अध्यक्ष महंत महाराज यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सचिव पाटील उपस्थित होते.
कार्याध्यक्षपदी आरोटे
बिलोली - अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या बिलोली तालुका कार्याध्यक्षपदी काशिनाथ आरोटे यांची निवड झाली. गेल्या १० वर्षांपासून ते दुबई येथे इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. संस्थापक-अध्यक्ष संजय मेडे, सचिव शरद माने, कार्याध्यक्ष अमोल माने यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.
माधव चिंचाळे यांची नियुक्ती
नांदेड - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्षपदी माधव चिंचाळे यांची नियुक्ती झाली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. या नियुक्तीचे अनेकांनी स्वागत केले.
निलपत्रेवार यांचा सत्कार
नायगाव - कुंटूर येथील नूतन सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांचा रुई येथे गजानन शिंदे यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी माधव पवार, गजानन पाटील, सुधाकर पांढरे आदी उपस्थित होते.
पिंगळीचा वीजपुरवठा खंडित
हदगाव - तालुक्यातील पिंगळी येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त बनले आहेत. कमकुवत विद्युत तारा व कमकुवत डीपीवरून गावासाठी वीजपुरवठा केला जातो. तारा आणि डीपी बदलण्याची मागणी गावकऱ्यांनी आ. माधवराव पाटील- जवळगावकर व संबंधित अभियंत्यांकडे केली आहे.