देगलूर (नांदेड) : देगलूर शहराच्या लगत असलेल्या व जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील लिंगनकेरूर तलाव आता पर्यटनस्थळ व पिकनिक पॉर्इंट म्हणून विकसित होणार असून हा तलाव नगर परिषदेकडे हस्तांतर करण्यास जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मान्यता दिली आहे.
आ.सुभाष साबणे यांनीही मागील कांही वर्षांपासून हा विषय लावून धरला होता. मुंबई येथे ८ नोव्हेंबर रोजी राज्यमंत्री शिवतारे यांच्या कक्षात झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, नगर परिषदेचे अधिकारी यांनी मंत्र्यांसमक्ष याचे सादरीकरण केल्यानंतर या हस्तांतरास मान्यता दिल्याचे शिरशेटवार यांनी सांगितले. लिंगनकेरूर तलावांतर्गत सिंचन क्षेत्र अतिशय कमी झाले असल्याने आणि हा तलाव आता देगलूर शहराच्या हद्दीत आलेला असल्याने एक चांगले पर्यटनस्थळ व पिकनिक पॉर्इंट म्हणून विकसित करण्याची मागणी तत्कालीन नगराध्यक्षा वंदना कांबळे, उज्ज्वला पदमवार यांच्या काळात राज्यशासनाकडे झाली होती. तत्कालीन जलसंपदामंत्री अजितदादा पवार यांनी या तलावाच्या हस्तांतरास तत्वत: मान्यता दिली होती. परंतु; जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी तलावांतर्गत मोठे सिंचन क्षेत्र असल्याची दिशाभूल करणारी माहिती दिली व स्वामित्व हक्क जलसंपदा विभागाकडे ठेऊन विकास कामे व सुशोभीकरण यासाठी देण्याचे मान्य केले. हा रेंगाळत पडलेला प्रश्न नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी आ. साबणे यांच्या पाठपुराव्यातून धसास लावला.
जवळपास २५ हेक्टर क्षेत्र असलेल्या तलाव परिसरात उद्यान, जॉगिंग ट्रॅक, स्विमिंग पूल, स्वच्छतागृह, रस्ते, लहान मुलांसाठी खेळण्या, विद्युतीकरण आदी सुविधा उपलब्ध करून पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाल्याने नगर परिषदेच्या उत्पन्नात भर पडेल, शिवाय छोट्या व्यावसायिकांना देखील चांगली आर्थिक प्राप्ती होऊ शकते. नगर परिषदेच्या सादरीकरणानंतर मंत्री विजय शिवतारे यांनी या हस्तांतरास मान्यता दिली. तसेच याच्या त्वरित अंमलबजावणीसाठी अधिका?्यांना सूचना दिल्याचे शिरशेटवार म्हणाले. यावेळी आ. साबणे यांच्यासह गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ, लाभक्षेत्र विकास विभागाचे अधीक्षक अभियंता, देगलूरचे नगरसेवक व नगर परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.