सुनील चौरे।लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : बरडशेवाळा गावात दोन जिल्हा परिषद शाळा व पाच अंगणवाड्या आहेत़ त्यापैकी नांदेड-नागपूर महामार्गावर रस्त्यालगत एक जिल्हा परिषद शाळा आहे़ बाजूलाच अंगणवाडी आहे़ केवळ १५ फूट अंतरावर असलेल्या अंगणवाडीसमोर १० सप्टेंबर रोजी एक अंत्यविधी उरकण्यात आला़ यामुळे सकाळी विद्यार्थ्यांना बाजूच्या रस्त्याने जावे लागले़ विशेष म्हणजे, गावात स्मशानभूमी आहे़पूर्वी तळ्याच्या काठी अंत्यविधी होत असत़ परंतु, लोकवस्ती वाढल्याने ही स्मशानभूमी गावाच्या मध्यभागी झाली़ जागा रिकामी असल्याने (गायरान) येथे शाळेची मोठी इमारत आहे़ समोर एरिगेशनचे कार्यालय आहे़ त्यामुळे येथे कॅम्पची शाळा झाली़ परंतु स्मशानभूमी हटविण्यात आली नाही़शाळेला संरक्षक भिंत केली तरी हा विषय बंद होतो़ तसा ठराव ग्रामपंचायतने एप्रिल महिन्यात घेतला होता़ परंतु, अद्यापही भिंत उभारण्यात आली नाही़ गावपुढारी या जागेत अतिक्रमण करून रस्त्यालगत प्लॉट विक्री करण्याचा गोरखधंदा करीत असल्याने ते संरक्षक भिंतीला विरोध करीत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे़खरे तर येथे मोठे तळे आहे़ शाळेच्या व अंगणवाडीला लागून त्यामुळे विद्यार्थ्यांवर शिक्षकांना विशेष लक्ष ठेवावे लागते़ अपघात होण्याची दाट शक्यता आहे़ तर दुसरीकडे पाण्याची भीती़ त्यामध्ये भर म्हणून स्मशानभूमी अंगणवाडीलगतच आहे़विद्यार्थी म्हणजे गावची संपत्ती़ त्यांचे शिक्षण, आरोग्य याची काळजी गावावर असतेच़ पण या गंभीर प्रकाराला कोणी लक्षात घेत नाही़ जिल्हा परिषद शाळेमध्ये खाजगी शाळा भरतात काय? शाळेच्या प्रांगणात अंत्यविधी उरकतात काय? तरीही प्रशासन याकडे गंभीरपणे बघण्यास तयार नाही़
याविषयी अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका चव्हाण म्हणतात, हा प्रकार गंभीर असून अंगणवाडीच्या मुलाचे वय ३ ते ६ वयोगटातील असते़ पाठीमागे तळे व समोर स्मशानभूमी़ यामुळे विद्यार्थी, पालकांत भीतीचे वातावरण असते़
शाळेचे मुख्याध्यापक एम़एस़ कदम म्हणतात, हा प्रकार गंभीर आहे़ त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे़ ग्रामपंचायतचे सहकार्य मिळत नाही़ जिल्हा परिषद शाळेमध्ये गोरगरिबांचे मुलबाळं शिक्षण घेतात़ त्यांच्यासाठी कोणी लक्ष देत नाहीत़ यापूर्वी ‘लोकमत’ने १० एप्रिलच्या अंकात हा विषय लावून धरला होता; पण पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ च आहे़
शालेय समितीचे अध्यक्ष श्रीधर मस्के यांनी याविषयी खंत व्यक्त केली़ विद्यार्थ्यांचे वय खेळणे, बागडण्याचे आहे़ या वयात अंत्यविधीच्या घटना डोळ्यांसमोर होणे म्हणजे त्यांच्या बालपणावर विपरीत परिणाम होतो, असे मानसशास्त्र सांगते़ त्यामुळेच घरी कोणाचा मृत्यू झाल्याने आपण मुलांना स्मशानभूमीत नेत नाही़ परंतु येथील विद्यार्थ्यांना मात्र अंत्यविधी ‘लाईव्ह’ बघायला मिळतो़