अशोकराव चव्हाणांची साथ भोवली; अर्धापूर नगराध्यक्षासह ८ नगरसेवकांची कॉँग्रेसमधून हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 02:18 PM2024-09-30T14:18:50+5:302024-09-30T14:20:42+5:30
नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह ८ नगरसेवकांवर शिस्तभंगाची कार्यवाही करत काँग्रेस पक्षातून हकालपट्टी..!!!
- गोविंद टेकाळे
अर्धापूर ( नांदेड) : काँग्रेसमधून निवडून येऊनही लोकसभा निवडणुकीत भाजपासाठी काम करणाऱ्या त्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह ८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम यांनी पत्रकार परिषदेतून दिली. या कारवाईने हकालपट्टी झालेल्या सर्वांना माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशोक चव्हाण यांची साथ भोवल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे.
अर्धापूर नगरपंचायत निवडणूक माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडल्या. अडीच वर्षाचा कालावधी लोटला असून गत काही महिन्यापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजप प्रवेश केला. काँग्रेस पक्षातून निवडून आलेले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांनी काँग्रेसमधून निवडून आले असतांनाही भाजपात प्रवेश केलेल्या अशोकराव चव्हाण यांच्यासोबत राहून लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केले. तसेच पक्षाच्या विविध बैठकांना अनुपस्थित राहणे, पक्ष विरोधी भूमिका घेतल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार केली. यानंतर पटोले यांनी जिल्हाध्यक्ष कदम यांना सदर नगराध्यक्ष, नगरसेवकांवर योग्य ती कारवाई करण्याबाबतचे अधिकार दिले.
दरम्यान, सदर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांची पक्षशिस्तीचा भंग केल्याबाबत काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कदम यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली. यावेळी तालुका प्रभारी डॉ.उत्तमराव इंगळे,सचिव पंडितराव शेटे, तालुकाध्यक्ष सुनील वानखेडे, प्रवक्ते सुभाष लोणे, रविंद्र डाढाळे, तालुका सचिव शेख.मकसूद आदींची उपस्थिती होती.
नगराध्यक्षांसह ८ नगरसेवकांची हकालपट्टी
नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, उपनगराध्यक्षा यास्मिन सुलताना मुस्वीर खतीब यांच्यासह आठ नगरसेवक १) शालीनी व्यंकटेश शेटे, २) मिनाक्षी व्यंकटी राऊत ३) वैशाली प्रविण देशमुख, ४) डॉ. पल्लवी विशाल लंगडे, ५) सोनाजी विठ्ठल सरोदे, ६) काजी सायरा बेगम काजी सल्लावोद्दीन, ७) म. सलीम कुरेशी, ८) नामदेव सरोदे