तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यावर अजय बाहेती यांनी कंपनीत पुन्हा उत्पादन सुरू केले होते. त्यासाठी शेतकऱ्यांकडून तीन महिन्यांच्या मुदतीवर हळद, सोयाबीन, तूर असे धान्य विकत घेतले होते. परंतु सहा महिन्यांनंतरही शेतकऱ्यांना त्यांचे पैसे न मिळाल्याने कंपनीच्या समोर शेतकऱ्यांनी आंदोलन सुुरू केले होते. जवळपास आठशे शेतकऱ्यांचे १८ ते २० कोटी रुपये देणे असल्याचे बाहेती यांनी लिहून दिले होते. तसेच काही शेतकऱ्यांना रक्कम देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच येत्या काही दिवसांत पूर्ण शेतकऱ्यांची रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु असे असताना अचानक ईडीने या प्रकरणात एन्ट्री मारत बाहेतीला अटक केली. त्यामुळे आता थकीत असलेले पैसे मिळणार की नाहीत, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. थकीत रकमेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे कंपनीच्या बाहेर आंदोलन सुरू आहे. आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांनी कंपनीच्या विरोधात तर काही जणांनी कंपनीच्या बाजूने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते, परंतु आता ईडीच्या कारवाईमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सरकार आणि कंपनीसोबत लढा
गेल्या सहा महिन्यांपासून ८०० हून अधिक शेतकऱ्यांचे जवळपास शंभर कोटीहून अधिक पैसे थकले आहेत. बाहेती हा आकडा १८ ते २० कोटी सांगत आहेत. पैसे मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेकांच्या घरातील लग्नसोहळे पुढे ढकलले आहेत. आता आम्ही मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांना निवेदन दिले आहे. केंद्रीय कृषिमंत्री यांचीही भेट घेणार आहोत. अशी प्रतिक्रिया इंडिया मेगा ॲग्रो अनाज कंपनी अन्यायग्रस्त समितीचे समन्वयक डॉ. सुरेश कदम यांनी दिली.