नांदेडमध्ये गणेशाचे जल्लोषात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:19 AM2018-09-14T00:19:51+5:302018-09-14T00:20:28+5:30

शहर व जिल्ह्यात विघ्नहर्ता श्री गणेशाचे ढोल, ताशांच्या गजरात विधिवतपणे स्वागत करुन घराघरात प्रतिष्ठापणा करण्यात आली.

Arrival of Ganesha celebrations in Nanded | नांदेडमध्ये गणेशाचे जल्लोषात आगमन

नांदेडमध्ये गणेशाचे जल्लोषात आगमन

googlenewsNext
ठळक मुद्देबच्चेकंपनीचा उत्साह शिगेला,भक्तीमय वातावरणात ‘श्री’ ची उशिरापर्यंत स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहर व जिल्ह्यात विघ्नहर्ता श्री गणेशाचे ढोल, ताशांच्या गजरात विधिवतपणे स्वागत करुन घराघरात प्रतिष्ठापणा करण्यात आली. सकाळपासूनच पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांनी बाजारात गर्दी केली होती़ खरेदीदरम्यान बच्चेकंपनीचा उत्साह ओसंडून वाहत होता. गणेशाच्या आगमनादरम्यान ढोल, ताशांच्या गजरात तरुणाई ताल धरत होती. यावेळी अकरा दिवसांचा गणपती आल्याने उत्साहात आणखीच वाढ झाली आहे.
शहरातील जुना मोंढा, आनंदनगर, भाग्यनगर, श्रीनगर, वर्कशॉप, तरोडा नाका, वजिराबाद, शिवाजीनगर, गोकुळनगर, वामननगर, होळी, सराफा, रंगार गल्ली, चौफाळा, गणेशनगर, भावसार चौक, चैतन्यनगर आदी नगरांमध्ये श्री गणेशाच्या स्वागतासाठी भक्तांनी उत्साहात खरेदी केली. यात आघाड्याची पाने, विड्याची पाने, मक्याची कणसे, सफरचंद, डाळींब, केळी, धोतऱ्याची फुले आणि पाने, दुर्वा, आंब्यांची डहाळे, झेंडू, गुलाब, कमळ, जास्वंद, जानवे, मोगरा, खारीक, खोबरे आदी पूजेसाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात विक्री झाले. बुधवारी रात्रीपासूनच विक्रेत्यांनी पूजेचे साहित्य व श्री गणेशाच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवले होते़
गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून गणेशाची मूर्ती नेण्यास गणेशभक्तांनी प्रारंभ केला़ २५ रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत गणेशाची मूर्ती विक्रीस ठेवण्यात आली होती.
गणपती खरेदी करतेवेळी गुलालाची उधळण करत गणरायाचे थाटात स्वागत केले. काही गणेश मंडळांनी महिनाभरापूर्वीच गणेशाची मूर्ती राखीव ठेवली होती.शहरात जवळपास दीड हजार ते दोन हजार स्टॉल विक्रेत्यांनी थाटले होते. ‘गणपती बाप्पा मोरया, आला रे आला गणपती आला’ चा गजर करत अनेक गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या गणपतीची थाटात वाजत-गाजत मिरवणूक काढली आणि प्राणप्रतिष्ठा केली.
पूजेसाठी नारळ (श्रीफळ) चा मान असल्याने आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून नारळ मराठवाड्यात आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. घरोघरी व गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या गणेशाची आरती करुन प्राणप्रतिष्ठा केली.
बाजारात बलूनपासून तयार केलेले विमान व मासे, कासव, पोपटाची किमत ३० रुपयापासून ५० रुपयापर्यत होती. ‘गणपती बाप्पा मोरया’ नावाची पट्टी १५ रुपयाला विकली जात होती. उंच बांबूवर लटकाविलेले विमान सर्वांचे आकर्षण ठरत होते. सिंहासन, चौरंगावर, पाटावर, अंबारित, मोरावर, हत्तीवर, सिंहावर विराजमान झालेले गणपती बाजारात विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणले होते.
गणपतीची ज्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली जाते त्या ठिकाणी प्रसन्न वातावरण रहावे म्हणून सजावटीचे साहित्य अनेक भक्तांनी खरेदी केले होते. यात कागदी फुले, कागदी मखर, विविध प्रकारची खेळणी, लाकडी चौरंग, विविध प्रकारच्या रंगबेरंगी रांगोळीचा समावेश होता. सजावटीचे साहित्य श्री गणेश चतुर्थीनिमित्त महागल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.रात्री उशिरापर्यंत श्री गणेशाच्या स्थापनेच्या मिरवणुका सुरु होत्या. सर्वत्र भक्तीमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना झाली.


समाजप्रबोधनपर देखावे उभारा-अरुण डोंगरे
विघ्नहर्त्या श्री गणरायाचे आगमन उत्साहात झाले आहे. जिल्हाभरातील श्री गणेश मंडळांनी सर्वांनी एकत्र घेत भक्तीभावाने श्री ची स्थापना केली. या कालावधीत शांतता टिकून राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. त्याचवेळी मंडळांनी समाजप्रबोधनपर देखावे उभारताना प्लास्टिकबंदी, मतदार नोंदणी, तंबाखूमुक्त जनजागृतीपर देखावे तयार करावेत. ज्यातून सामाजिक सद्भाव वाढीस लागेल, असे जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले.



दुर्वाला आला भाव
श्री गणरायाला दुर्वा (हरळी) प्रिय असल्याने गणरायाच्या डोक्यावर किंवा पायाजवळ त्या ठेवल्या जातात. पूजेसाठी दुर्वाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. श्री गणरायाला २१, ५१, १०१,१००८ अशा दुर्वा अर्पण करतात. सदरील माळ श्री गणेशाच्या गळ्यात घालतात. दुर्वा अर्पण केल्याने गणेश पावतो, अशी अख्यायिका सांगितली जाते. श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अनेक विक्रेत्यांनी दुर्वाच्या जुड्या आणि माळ विक्रीसाठी आणल्या होत्या. दुर्वाची एक जुडी पाच रुपयाला विकल्या गेली तर दुर्वाची माळ २५ ते ३० रुपयाला विकली गेल्याचे दिसून आले.

शहर, जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त
श्री गणेशाची गुरुवारी स्थापना होत असताना जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पोलीस दलाच्या वतीने कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक, ११ उपविभागीय पोलीस अधिकारी, ४३ पोलीस निरीक्षक, १४० सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच २ हजार ७७६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आरसीपीच्या ८ प्लाटून आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्याही तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी ७५ पोलीस प्रशिक्षणार्थीही बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात गणेशोत्सव काळात ७०० पुरुष होमगार्ड आणि १०० महिला होमगार्डची मदत घेण्यात येत आहे.


सोशल मीडियाचा गैरवापर गंभीर गुन्हा-संजय जाधव
श्री गणेश उत्सवात सामाजिक सलोखा कायम राहील याची खबरदारी सर्व मंडळांसह प्रत्येक नागरिकाने घ्यावी. सोशल मीडियाचा वापर अत्यंत जबाबदारीने करावा. सोशल मीडियाचा गैरवापर हा गंभीर गुन्हा आहे. मंडळांनी डिजेवर खर्च न करता आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे कुटुंबिय, केरळमधील पूरग्रस्त आदी गरजूंना मदतीचा हात द्यावा, हीच बाब सामाजिकदृष्ट्या महत्वाची असल्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव म्हणाले.

 

Web Title: Arrival of Ganesha celebrations in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.