नांदेड : अर्धापूर तालुक्यातील सत्य गणपती येथे जनसंवाद यात्रेनिमित्त उपस्थिती लावल्यानंतर काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी आरक्षणाबाबत जाब विचारला. खासदार चव्हाण यांचे भाषण मध्येच थांबवून कार्यकर्त्यांनी आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करण्यास भाग पाडले. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला होता.
काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील सत्य गणपती मंदिर परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार वसंतराव चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार चव्हाण भाषण करण्यासाठी उभे राहिल्यानंतर अचानक काही मराठा आंदोलक उठून त्यांच्या समोर आले.
मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे काय? मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केलं? संसदेत मराठा आरक्षणाची मागणी केली का? सत्ताधाऱ्यांना मराठा आरक्षणासाठी पाठिंबा मागितला का? ते पाठिंबा देणार आहेत काय? अशी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर खासदार चव्हाण यांनी वेळ भाषण थांबवत मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असून, मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच मी निवडून आलो आहे. यापुढेही मराठा आरक्षणासाठी पाठिंबा राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आंदोलक शांत झाले.