Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या खासदार अशोक चव्हाण यांचे एक भाषण चर्चेत आले आहे. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. एकवेळ टीव्ही बंद पडेल, पण हे थांबत नाहीत. २४ तास सुरू असतात, असे अशोक चव्हाण म्हणाले.
एका कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाणांनी विरोधक सातत्याने लक्ष्य करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
माझं नाव घेतल्याशिवाय गमत नाही -अशोक चव्हाण
अशोक चव्हाण म्हणाले, "विकासात्मक कामं करण्यासंदर्भात ज्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा करण्याकरिता अशोक चव्हाण सदैव तुमच्याबरोबर आहे, हे जाहीरपणे मी सांगतो. काही मतभेद नाहीत. पण माझ्या उणीवा लांबलचक यादी करून... हे अशोक चव्हाणमुळे... हे अशोक चव्हाणमुळे; माझे नाव घेतल्याशिवाय काही गमतच नाही."
अशोक चव्हाण विरोधकांना म्हणाले, "मलाही जिवंत ठेवा"
"माझं म्हणणं मीच उद्या नाही राहिलो, राजकीय क्षेत्रात कोणावर बोलणार तुम्ही? बोलणार कोणावर? माझं म्हणणं आहे की, मलाही जिवंत ठेवा. मी जिवंत राहिलो, तर तुम्ही पण जिवंत राहाल. मीच संपलो, तर तुम्ही कसे राहणार? तुम्हाला बोलायला काही राहणार नाही", असे उत्तर अशोक चव्हाणांनी दिले.
"मला संपवू नका. जी मंडळी टीका करतात, त्यांना म्हणतोय. २४ तास चालू असतात. एवढं तर वाईट केलं नाही ना कोणाचं? केलंय का? माझं म्हणणं एवढंच आहे की, इथंपर्यंत यायला ४० वर्षे गेली. शेलगावने मला साथ दिलेली आहे, मी नाकारणार नाही, विसरणार नाही", असे अशोक चव्हाण म्हणाले.