नांदेड: मंत्रीपदासाठी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार पडले नसते, असा गौफ्यस्फोट माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी केला होता. त्यावर आज मंगळवारी नाना पटोले यांनी पलटवार करत अशोकराव चव्हाण यांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही. त्यांचे सर्व काही मी बाहेर काढेन, पक्षाचा त्यांनी स्वतः साठी वापर केला. राज्यात काय पाप केले? याची जंत्री माझ्याकडे आहे असा आरोप केला.
लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदार संघात प्रचारात सध्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंगळवारी नाना पटोले म्हणाले, अशोकराव चव्हाण हे बांधकाम मंत्री असताना त्यांच्याकडे नोटा छापायची मशीन होती. ती बंद पडली त्याचा त्रास अशोक चव्हाणांना होत आहे. सत्तेचा स्वत:साठी फायदा करणाऱ्या अशोकराव चव्हाणांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही. ज्या काँग्रेसमध्ये राहिले, त्याच काँग्रेसमधील लोकांना हरविण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. त्यांनी काँग्रेसबद्दल बोलू नये. त्यांची अंडे-पिल्ले बाहेर काढण्याचे औषध माझ्याकडे आहे, असा दावाही पटोले यांनी गेला.
चव्हाण विरोधातील जंत्री माझ्याकडे भाजपाच्या आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत अशोकराव चव्हाणांचा कच्चाचिट्ठा वाचून दाखविला होता. त्यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे आहे. ते कसं कमीशन खातात याची माहिती आहे. त्यांनी राज्यात काय पाप केले, याची मोठी जंत्री आहे. ज्या पक्षात राहतात तिथेच खड्डा करतात. भाजपात काय खड्डा केला हे निकालानंतर सर्वांना कळेल असा आरोपही नाना पटोले यांनी केला.