नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांचेच वर्चस्व सिद्ध झाले आहे. रविवारी झालेल्या मतमोजणीत २१ पैकी १७ जागांवर महाविकास आघाडीच्या पॅनेलने यश मिळविले आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला असून केवळ चार जागांवर त्यांना समाधान मानावे लागले. बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. २ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाची रविवारी मोजणी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या मतमोजणीत अनेक धक्कादायक निकाल हाती आले. या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक १३ जागी विजय मिळविला. मित्रपक्ष राष्ट्रवादीने ३ तर शिवसेनेला एका जागी यश मिळाले. भाजपचे चिखलीकर पिता-पुत्र आणि गोरठेकरांचे चिरंजीव असे तिघे विजयी झाले आहेत. भाजपला एकूण चार जागी विजय मिळाला. बँकेचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या या बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व संचालक प्रामाणिक प्रयत्न करतील, याची मला खात्री आहे. मागील काही वर्षात एकाधिकारशाहीमुळे या संस्थेची वाताहत झाली. ही बँक वाचवण्यासाठी मी राज्य सरकारच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचे अनुदानही मिळवून दिले. बँकेला चांगल्या परिस्थितीत आणण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे. - अशोक चव्हाण, पालकमंत्री, नांदेड
अशोक चव्हाण यांचा भाजप खासदाराला दे धक्का; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 3:23 AM