अशोक चव्हाण-गोरठेकर यांच्यात मनोमिलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 01:01 AM2019-03-23T01:01:13+5:302019-03-23T01:01:17+5:30
काँग्रेस नेते खा़ अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे माजी आ़ बापूसाहेब गोरठेकर यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे़ मात्र शुक्रवारी या दोन्ही नेत्यांत मनोमिलन झाले़
नांदेड : काँग्रेस नेते खा़ अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे माजी आ़ बापूसाहेब गोरठेकर यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे़ मात्र शुक्रवारी या दोन्ही नेत्यांत मनोमिलन झाले़ कलामंदिर येथील गोरठेकर यांच्या निवासस्थानी झालेल्या संयुक्त बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद साधत जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद काँग्रेसच्या पाठीशी उभी करण्याचा शब्द गोरठेकर यांनी दिला़
खा़ अशोक चव्हाण यांच्या पाठीशी काँग्रेस एकमुखाने उभी आहे़ दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडूनही काँग्रेसला मोठ्या अपेक्षा आहेत़ मात्र, राष्ट्रवादीचे नेते माजी आ़ बापूसाहेब गोरठेकर काँग्रेसला कितपत सहकार्य करतील याबाबत साशंकता होती़ शुक्रवारी या दोन्ही नेत्यांसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली़ सुमारे ४० मिनिटे चाललेल्या या बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाली़ बैठकीनंतर काळाची गरज ओळखून आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी लावण्याचा शब्द गोरठेकर यांनी दिल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे़
यावेळी माजी पालकमंत्री आ़डी़पी़सावंत, आ़ अमरनाथ राजूरकर, श्याम दरक, राष्ट्रवादीचे जगन शेळके, वंगलवार सावकार, रमेश सरोदे, माधव कोलगणे, जीवन चव्हाण, बाळासाहेब देशमुख, दिलीप कदम आदींची उपस्थिती होती़
दोन्ही पक्षांची समन्वय समिती स्थापणार
आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकजुटीने आघाडीचा धर्म पाळतील असा शब्द एकमेकांना देतानाच निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय या चर्चेवेळी घेण्यात आला़ दरम्यान, प्रचाराच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह छगन भुजबळ यांच्या प्रचारसभांचे नियोजनही यावेळी करण्यात आले़ याबरोबरच उमेदवार निश्चित झाल्यानंतर गोरठा येथे दोन्ही पक्षाची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णयही झाला़