नांदेड/बीड : सार्वजनिक बांधकाममंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने एकहाती वर्चस्व मिळविले आहे.मतदारसंघातील एकूण १५१ पैकी १२४ ग्रामपंचायतींमध्येे काँग्रेसचे पॅनल विजयी झाले आहे. भोकरमधील ६३ पैकी ५०, मुदखेडमधील ४५ पैकी ३७, अर्धापूरमधील ४३ पैकी ३७ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा वरचश्मा राहिला आहे. मात्र, बारड या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत शिवसेनेने बहुमत मिळविले आहे. तेथे शिवसेनेच्या बाळासाहेब देशमुख यांच्या पॅनलला १७ पैकी १६ जागांवर विजय मिळाला आहे.
परळीत धनंजय मुंडेंचेच वर्चस्वबीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना हादरा बसला. पालकमंत्री धनंजय मुंडे, आ.सुरेश धस, माजी आ. अमरसिंह पंडित, आ. नमिता मुंदडा यांनी आपापल्या मतदारसंघात यश मिळवले.परळी विधानसभा मतदारसंघातील परळी व अंबाजोगाई तालुक्यातील एकूण बारापैकी १० ग्रामपंचायती आपल्या पॅनेलकडे आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा मतदारांवर परिणाम जाणवला नाही.