नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार?; चर्चा रंगल्यानंतर अशोक चव्हाणांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 03:10 PM2024-10-19T15:10:59+5:302024-10-19T15:11:47+5:30

भाजपकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल, त्याला आम्ही पूर्ण सहकार्य करू, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

Ashok Chavan reaction on Nanded Loksabha by election candidacy | नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार?; चर्चा रंगल्यानंतर अशोक चव्हाणांचा खुलासा

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार?; चर्चा रंगल्यानंतर अशोक चव्हाणांचा खुलासा

BJP Ashok Chavan ( Marathi News ) : काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीत भाजपकडून कोणाला मैदानात उतरवलं जाणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचे नावही या पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी चर्चेत आले होते. मात्र मी ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच भाजपकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल, त्याला आम्ही पूर्ण सहकार्य करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीबद्दल बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, "मी राज्यसभेत खासदार आहे. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याचा प्रश्नच नाही. माझ्या उमेदवारीच्या बातम्या पूर्णपणे कपोलकल्पित आहेत. भाजपचा उमेदवार ठरवण्याचं काम केंद्रीय पातळीवरून होईल. पक्षाकडून जो उमेदवार दिला जाईल, त्याला आम्ही सहकार्य करू," असं स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिलं आहे.

नांदेड पोटनिवडणुकीत चुरस; काँग्रेस-एमआयएमकडून कोण मैदानात?

नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली असून ‘एमआयएम’नेदेखील ही पोटनिवडणूक लढविण्याची घोषणा केली. ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील हे पोटनिवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. एमआयएमची उमेदवारी काँग्रेसचे टेन्शन वाढविणारी असून, आता तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती धरले. त्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर झाले होते; परंतु काँग्रेसने माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या रूपाने अनुभवी चेहरा पुढे करत त्यांना ताकद देण्याचे काम केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चव्हाणांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करत पन्नास हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळविला. त्यामुळे मरगळलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली होती; मात्र दुर्दैवाने खासदार वसंतराव चव्हाण यांचे २६ ऑगस्ट रोजी निधन झाले. तद्नंतर आता नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली. 
 

Web Title: Ashok Chavan reaction on Nanded Loksabha by election candidacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.