भोकर : विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मतदारांनी दिलेल्या मताधिक्याने मतदारसंघात अशोकपर्वाला स्वीकारुन प्रतिस्पर्धी विरोधकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आणि भोकरमध्ये चव्हाण विरुद्ध गोरठेकर यांच्यातील पारंपारिक लढतीत १९७८ ची पुनरावृत्ती करुन चव्हाण यांचेच वर्चस्व पुन्हा सिध्द केले.
लोकसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघामध्ये काँग्रेसला ५ हजाराची पिछाडी तर नांदेड दक्षिण मतदारसंघात ३० हजार मतांची आघाडी घेतली तरीही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव झाल्यामुळे ते विधानसभा निवडणुकीत कोणता निर्णय घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भोकर मतदारसंघातून काँग्रेसने अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिल्यामुळे राज्याचे लक्ष मतदारसंघाकडे लागले होते. लोकसभेतील पराभव जिव्हारी लागलेली काँग्रेस सर्व शक्तीनिशी मैदानात उतरल्याने काँग्रेसविरुद्ध भाजपा लढत निश्चित झाली. लोकसभेतील विजयानंतर भाजपाने विधानसभा जिंकण्याचा संकल्प केला मात्र उमेदवारी देण्यावरून बरीच खलबते उडाली. भाजपातील निष्ठावंतांना डावलून ऐनवेळी राष्ट्रवादी पक्षातून आलेल्या माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर यांना खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी विशेष प्रयत्न करुन उमेदवारी मिळवून दिल्याने लोकसभेत एकवटलेली भाजपा अंतर्गत दुभंगल्याचे चित्र प्रचारात दिसून आले.
निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी स्वत: लक्ष घालून काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेत प्रचाराचे नियोजन केले. चव्हाण यांनी मतदारांच्या भावना ओळखून प्रचारात लहानथोर, नवयुवक यांच्या भेटीवर भर दिला. शहर, ग्रामीण भागात पक्षाची भूमिका मांडत सत्ताधारी पक्षाने पाच वर्षात केलेल्या कामगिरीवर चौफेर समाचार घेत ग्रामपंचायत सारखी निवडणूक समजू नका, मी येथेच मरणार अशी भावणीक साद घालून सिंचन, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पीककर्ज, पीकविमा यासरख्या प्रश्नासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली. यास मतदारांनीसुध्दा जे लोकसभेत झाले ते विधानसभेत होणार नाही अशा सुरात प्रतिसाद दिला.
काँग्रेस प्रचारासाठी शहरी, ग्रामीण कार्यकर्ते एकवटले होते. त्यांनी आपापले क्षेत्र मजबूत करण्यासाठी डोळ्यात तेल ओतून विरोधकांना कसलीही संधी दिली नाही. यामुळे झालेल्या मतदानात लोकसभेतील हाणी भरुन काढीत प्रत्येक सर्कलमध्ये विरोधका पेक्षा किमान १० हजाराचे मताधिक्य काँग्रेसला मिळून विजय संपादन केला. यासाठी माजी आमदार अमिता चव्हाण, आ. अमरनाथ राजुरकर, गोविंदराव नागेलीकर, जगदीश भोसीकर, सुभाष पाटील किन्हाळकर, संजय देशमुख लहानकर, गोविंदबाबा गौड, प्रकाश देशमुख भोसीकर, बाळासाहेब रावणगावकर, विनोद चिंचाळकर, शेख युसूफ, सुभाष कोळगावकर, सुर्यकांत बिल्लेवाड, रामचंद्र मुसळे, गुलाबराव चव्हाण, गणेश राठोड, संजय बरकमकर, सिद्धेश्वर पिटलेवाड, ताहेरबेग, खाजु इनामदार, विठ्ठल धोंडगे, राष्ट्रवादीचे आनंद चिठे, शिवाजी कदम आदीसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
भोकरमध्ये लोकसभेत ५ हजारांची पिछाडी, विधानसभेत ३३ हजारांचे मताधिक्यलोकसभा निवडणुकीत ५ हजार मताने पिछाडीवर राहिलेल्या भोकर तालुक्यात विधानसभेत ३३ हजाराचे मताधिक्य मिळाले. भोकर तालुक्यात काँग्रेसला ५१ हजार ४५० तर भाजपाला १७ हजार ७६४ मते मिळाली. यात सर्वाधिक मतदान पाळज गटात काँग्रेसला १४ हजार ८६४ तर भाजपाला ५ हजार ९८ मते मिळाल्याने येथे काँग्रसला ८७६६ मतांची आघाडी मिळाली. भोसी गटात काँग्रेस १३,१२४, तर भाजपा ३७६३ मते मिळाल्याने काँग्रेसला ९६५० मताची आघाडी मिळाली आणि पिंपळढव गटात काँग्रेसला १२७९७ तर भाजपाला ४४८८ मते मिळाल्याने येथेही काँग्रेसलाच ८३०९ मतांची आघाडी मिळाली. भोकरमध्ये काँग्रेसला १०७०५ तर भाजपाला ४४१५ मते पडल्याने येथेही ६२९० मतांची आघाडी मिळाल्याने प्रचारात विरोधकांनी केलेल्या आरोपांना मतदारांनीच मतातून उत्तर दिले. लोकसभा मतदानात भाजपाला आघाडी दिलेल्या गावांनी काँग्रसला आघाडी दिल्याचे स्पष्ट झाले आहे़