अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध; जाणून घ्या कोणते होते आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 07:14 PM2019-03-28T19:14:32+5:302019-03-28T19:15:59+5:30
दाखल झालेले तीनही आक्षेप फेटाळल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे़
नांदेड : काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध ठरला आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत दाखल झालेले तीनही आक्षेप फेटाळल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे़ दुपारी सुनावणी झाल्यानंतर रात्री ९.३० वाजता निकाल देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. रात्री पुन्हा अर्ध्या तासाने वेळ वाढविण्यात आली. अखेर रात्री १०.४५ वाजता निकाल देण्यात आला. चव्हाण यांची बाजू अॅड. पी.एस. भक्कड, तर आक्षेपकर्त्याची बाजू अॅड. सोनारीकर यांनी मांडली.
आक्षेप आणि स्पष्टीकरण
1.काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप दाखल करताना बहुजन महापार्टीचे शेख अफजलोद्दीन यांनी चव्हाण यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती आणि २०१९ च्या प्रतिज्ञापत्रात तफावत असल्याचे सांगताना चव्हाण यांनी कुटुंबियांसोबत आर्थिक व्यवहाराची माहिती नसल्याचा आक्षेप नोंदविला होता. हा आक्षेप फेटाळून लावताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २०१४ मधील किसन काठोरे विरुद्ध अरुण सावंत यांच्या प्रकरणाचा संदर्भ दिला.
2.फॉर्म क्र. २६ ची माहिती भरताना चव्हाण यांनी त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची अर्धवट माहिती सादर केल्याचा आक्षेप रवींद्र थोरात या अपक्ष उमेदवाराने घेतला होता.
3.तिसरा आक्षेप थोरात यांनीच घेताना चव्हाण यांच्याकडे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनची उज्ज्वल गॅस एजन्सी असून ते थेट शासनाचे लाभार्थी ठरत असल्याचा आक्षेप होता. हा आक्षेप फेटाळून लावताना शासनाच्या अखत्यारीत असलेले हे महामंडळ आहे. ते थेट शासन चालवत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हा तर विरोधकांचा कट
लोकशाही मार्गाने निवडणूक जिंकणे ही खरी प्रक्रिया आहे; परंतु न्यायालयीन व्यवस्थेत एखाद्याला गुंतवून ठेवणे व त्यातून जनाधार नसताना यश मिळविण्याचा काहींचा प्रयत्न होता़ असाच प्रकार काही वर्षांपूर्वीही विरोधकांनी अवलंबिला होता; परंतु त्यावेळीही ते अपयशी ठरले होते़ खोडसाळपणामुळे सत्य झाकले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया निकालानंतर खा़ अशोक चव्हाण यांनी दिली़