नांदेड : कधीकाळी काँग्रेससोबत असलेले काही नेते काँग्रेसपासून दुरावलेले आहेत. अशाच पहिल्या फळीतील नेत्यांशी संवाद साधण्यावर अशोक चव्हाण यांनी भर दिला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब गोरठेकर यांच्यानंतर मंगळवारी माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर यांच्याशी मनोमिलन करण्यात खा. चव्हाण यांना यश आले आहे. या संवादानंतर निवडणुकीत संपूर्ण सहकार्याची ग्वाही कुंटूरकर यांनी दिली.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते बापूसाहेब गोरठेकर यांचा काँग्रेससोबत असलेला संघर्ष मावळला आहे. खा. अशोक चव्हाण यांनी नुकतीच त्यांच्या कलामंदिर येथील निवासस्थानी भेट घेवून सुमारे पाऊणतास चर्चा केली. या चर्चेनंतर संपूर्ण सहकार्याची ग्वाही देतानाच गोरठा येथे काँग्रेस-राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. गोरठेकर यांच्याशी झालेल्या या मनोमिलनानंतर खा. चव्हाण यांनी मंगळवारी गंगाधरराव कुंटूरकर यांच्याशी संवाद साधला. एकेकाळी काँग्रेसचे नेते असलेल्या कुंटूरकर यांनी मंत्रिपद सांभाळलेले असून नांदेड जिल्हा परिषदेचे ते तब्बल बारा वर्षे अध्यक्ष होते. मात्र, दरम्यानच्या काळात काँग्रेससोबतचे त्यांचे संबंध बिघडले. यातूनच २००१ मध्ये कुंटूरकर यांनी हरिहरराव भोसीकर आणि माजी आ. बापूसाहेब गोरठेकर यांच्यासह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत कुंटूर येथे हा प्रवेश सोहळा झाला होता. तेव्हापासून उघड विरोध नसला तरी काँग्रेससोबत या नेत्यांचा अंतर्गत संघर्ष सुरू होता. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुकांत काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने उभे ठाकायचे. मात्र मंगळवारी अशोक चव्हाण यांनी थेट कुंटूरकर यांच्या निवासस्थानी जावून सदिच्छा भेट घेत संवाद साधल्याने या दोन्ही नेत्यांत ऐन निवडणुकीत समन्वय झाला आहे. यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्तेही आता नव्या जोमाने प्रचारात सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत.नायगाव तालुक्यात मिळणार मदतगंगाधरराव कुंटूरकर यांचा नायगाव तालुक्यात दबदबा आहे़ कुंटूरकर यांचे पुत्र राजेश कुंटूरकर जिल्हा बँकेचे संचालक असून सून मधुमती कुंटूरकर या जिल्हा परिषदेच्या सभापती आहेत़ या मनोमिलनामुळे नायगावमध्ये काँग्रेसला मोठी मदत मिळेल़
दुभंगलेली मने सांधण्यावर अशोक चव्हाण यांचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:32 AM
कधीकाळी काँग्रेससोबत असलेले काही नेते काँग्रेसपासून दुरावलेले आहेत. अशाच पहिल्या फळीतील नेत्यांशी संवाद साधण्यावर अशोक चव्हाण यांनी भर दिला आहे.
ठळक मुद्देकुंटूरकरांशी संवाद : सहकार्याची मिळविली ग्वाही