विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी भोकर विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत़ त्यांच्यासमोर भाजपाचे श्रीनिवास गोरठेकर तर वंचित बहुजन आघाडीचे नामदेव आयलवाड हे प्रमुख उमेदवार असले तरी काँग्रेसचा गड म्हणून भोकर मतदारसंघाची ओळख असून या मतदारसंघात विविध विकासकामे झालेली असल्याने चव्हाण यांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे़
भोकर मतदारसंघावर चव्हाण कुटुंबियाचे प्राबल्य असल्याचा इतिहास आहे़ १९६२ मध्ये शंकरराव चव्हाण याच मतदारसंघातून विजयी झाले होते़ त्यानंतर १९६७, १९७२ आणि १९७८ अशा चार विधानसभा निवडणुकांत विजय मिळवित त्यांनी महाराष्ट्राचेही नेतृत्व केले़ त्यानंतर २००९ मध्ये अशोक चव्हाण हे तब्बल लाखाहून अधिक मताधिक्य घेत या मतदारसंघातून विजयी झाले होते़ २०१४ मध्ये अमिता चव्हाण यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि यावेळी पुन्हा अशोक चव्हाण रिंगणात उतरले आहेत़ त्यांच्यासमोर भाजपाचे उमेदवार श्रीनिवास गोरठेकर नशीब आजमावत आहेत़ गोरठेकर हे काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपात डेरेदाखल झालेले आहेत़
जमेच्या बाजूपारंपरिक काँग्रेसचा गड म्हणून भोकर विधानसभा मतदारसंघाची ओळख असल्याने अशोक चव्हाण यांचा मतदारसंघात दबदबा आहे़ चव्हाण यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून या भागात रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे़ शेतकऱ्यांनाही कारखान्यामुळे आर्थिक बळ मिळाले आहे़ पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळवून दिल्यामुळे येणाºया काळात येथील सिंचनाचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे़ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालीच मतदारसंघात सुमारे २०० कि़मी़ नाल्यांचे खोलीकरण व सरळीकरणाचे काम झाले आहे़उणे बाजूअशोक चव्हाण काँग्रेसच्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठीही वेळ देत आहेत़ त्यामुळे भोकरमध्ये तुलनेने कमी वेळ मिळत आहे़ दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपाने या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते़ भाजपाने भोकर मतदारसंघातच मोठ्या सभांचे नियोजन केले असून खा़प्रताप पाटील चिखलीकर हेही मागील काही दिवसांपासून भोकर मतदारसंघातच तळ ठोकून आहेत़