Ashok Chavhan on Congress Deafeat : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या, तर शिंदेसेना 58 आणि अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. धक्कादायक बाब म्हणजे, महाविकास आघाडीला फक्त 47 जागांवर समाधान मानावे लागले. मविआत सर्वात खराब कामगिरी काँग्रेसची ठरली. पक्षातील अनेक दिग्गजांचाही दारुण पराभव झाला. यावरुन आता भाजप नेते अशोक चव्हाण यांनी बोचरी टीका केली आहे.
काही काळापूर्वी भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाणांना भाजपने राज्यसभेवर पाठवले, तर त्यांची मुलगी श्रीजया यांना नांदेडच्या भोकर मतदारसंघातून उमेदवारी दिली. महायुतीच्या त्सुनामीत श्रीजया यांचा दणदणीत विजय मिळवला. श्रीजया यांच्या रुपाने चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात उतरली आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर अशोक चव्हाण आणि त्यांची कन्या श्रीजया यांनी रविवारी भोकर मतदार संघातील विविध गावात जाऊन मतदारांचे आभार मानले. मुदखेड येथे मतदारांशी संवाद साधताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या देशमुख बंधू, नाना पटोले यांच्यासह बाळासाहेब थोरातांवर बोचरी टीका केली.
काँग्रेसमध्ये राहिलंय काय? सगळे साफ झाले...'लातूरमध्ये एक पडला आणि दुसरा निसटता निसटता कसातरी निघालाय. हे महाराष्ट्राचे नेतृत्व करणार होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले तर नांदेड अन् भोकरच्या नावाने बोंबलून बोंबलून निघून गेले. फक्त दिडशे मतांनी कसेबसे निवडून आलेत. हे नेते महाराष्ट्राचे नेतृत्व करणार होते. त्या काँग्रेसमध्ये राहिलंय काय आता? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सगळे साफ झाले. ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला, ते सगळे साफ झाले...त्यामुळे मला कुणी त्रास देऊ नका,' अशी बोचरी टीका खा. अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.
श्रीजया चव्हाण यांनी राखला गडमहाराष्ट्राला मुख्यमंत्री देणारा आणि चव्हाण कुटुबियांचा बालेकिल्ला म्हणून भोकर मतदारसंघाची ओळख आहे. येथे शंकरराव चव्हाण यांनी विजय मिळवित सतत 20 वर्षे नेतृत्व केले होते. त्यानंतर सातत्याने हा मतदार संघ चव्हाण कुटुंबियांच्या पाठीशी राहिला आहे. 2014 अमिता चव्हाण, 2019 मध्ये अशोक चव्हाण यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर यावेळी खुद्द अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि त्यांनी त्यांनी कुटुंबाचा गड राखला. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे तिरुपती कदम होते. या निवडणुकात श्रीजया यांना 133187 मते मिळाली, तर कदम यांच्या पारड्यात 82636 मते पडली. अशारितीने श्रीजया यांनी 50551 मतांनी दणदणीत वीजय मिळवाल.