नांदेड : जिल्हा परिषदेनंतर ग्रामीण भागातील राजकारणाचा अड्डा असणाऱ्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आठ दिवसात घोषित होणार आहे. या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच जिल्ह्यात शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांमध्ये बँकेच्या मतदार यादीवरून वादाची ठिणगी पडली आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक लवकरच घोषित होणार आहे. ८ फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी घोषित करण्यात आली आहे. या बँकेसाठी ९४० मतदार राहणार आहेत. त्यातच न्यायप्रविष्ष्ट प्रकरणात न्यायालयाचा निर्णयही लागू राहील. तत्पूर्वी जिल्हा बँकेच्या प्रारुप मतदार यादीवर आक्षेप घेताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिलेल्या आणि विद्यमान खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावावरील आक्षेप लातूरच्या विभागीय सहनिबंधकांनी मान्य केला होता. यामुळे चिखलीकर हे थेट बँकेच्या निवडणुकीतून बाहेर होऊ लागले. मात्र या निर्णयाला चिखलीकरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. विभागीय सहनिबंधकांना याबाबतचे अधिकारच नसल्याचे सांगत चिखलीकरांच्या नावावरील आक्षेप औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला. त्यामुळे पुन्हा खा.चिखलीकर हे निवडणुकीच्या रिंगणात परतल्याचे स्पष्ष्ट झाले.
गेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना बँकेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ष्ट्रवादीने हातमिळवणी करीत जिल्हा बँकेवर सत्ता काबीज केली होती. मात्र आता पुन्हा एकदा राजकारणाचे चित्र बदलले आहे. राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाले असून सेनेसह राष्ष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आले आहेत. त्यात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्यात पुन्हा एकदा विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. त्याची तुलना आता मागील पाच वर्षातील विकासकामासोबत होत आहे. जिल्ह्याला भाजपा सरकारच्या कालावधीत एक छदामही विकासासाठी मिळाला नव्हता. त्यामुळे बदललेली परिस्थिती जिल्हा बँकेचे आता असलेले चित्र बदलण्यासाठी कितपत उपयोगी ठरेल हे निवडणुकीनंतरच स्पष्ष्ट होणार आहे.