नांदेड : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवार देण्याची घोषणा केली. तद्नंतर अंतरवाली सराटीत राजकीय नेत्यांसह जरांगे फॅक्टरवर स्वार होवू इच्छिणारांची गर्दी वाढली आहे. विशेष, म्हणजे राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांकडून इच्छुक असणारे दावेदार आता मनोज जरांगे पाटील यांच्या आश्रयाला येत आहेत. परंतु, पहिल्या यादीत इच्छुक म्हणून अर्ज केलेले बहुतांश जण आपल्या मतदार संघात ‘मीच जरांगे’ अन् मीच उमेदवार असल्याचाही दावा करत आहेत.
मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात मागील चौदा ते पंधरा महिन्यात मराठा आरक्षण आंदोलनाने व्यापक स्वरूप प्राप्त केले. पहिल्यांदाच एकमुखी नेतृत्व स्वीकारून मराठा समाजा एवढ्या मोठ्या प्रमाणात एकवटला आहे. उपोषणानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईकडे मोर्चा काढत सरकारची कोंडी केली होती. तद्नंतर सरकारनेही ओबीसी नोंदी तपासणी कामास वेग देऊन सगे-सोयरेचा अध्यादेश काढला. परंतु, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी न झाल्याने सरकारविरोधातील समाजाचा रोष वाढला असून, आता प्रत्यक्षात निवडणुकांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकड्यावर असलेल्या महाविकास आघाडीलाही त्यांची जागा दाखवून देण्याचा निर्धार जरांगे यांनी केला आहे. त्याच अनुषंगाने आता विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे अन् जिथे जिंकणे शक्य नाही तिथे पाडायचे, अशी घोषणा केली. त्यामुळे महायुतीसह आघाडीच्या घटक पक्षाचेही विद्यमान आमदार बुचकळ्यात पडले आहेत. जरांगे-पाटील नेमकं कुणाला पाडा म्हणणार अन् कोणत्या मतदारसंघात आपल्या शिल्लेदारांना प्रत्यक्षात निवडणूक रिंगणात उतरविणार हे येणारा काळच सागेल. मात्र, आजघडीला जरांगे फॅक्टरवर स्वार होऊन आमदार होण्याचे डोहाळे अनेकांना लागले आहेत. त्यात राजकीय पक्षातील इच्छुकांसह अपक्ष तयारी करणारे अन् मराठा आरक्षण लढ्यात, सामाजिक चळवळीत काम करणाऱ्यांचाही समावेश आहे.
दरम्यान, जरांगे-पाटील यांनी गुरुवारी इच्छुकांना पुन्हा अंतरवाली सराटीत पाचारण केले असून, त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या जात आहेत. एका विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्यांना एकत्र बोलावून त्यांच्यातून एक चेहरा देण्याचा आदेश पाटील देत आहेत. पण, अनेक ठिकाणी एकमत होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी जरांगे हे स्वत: निर्णय घेऊन उमेदवार देणार आहे, त्यामुळे आगामी काळात इच्छुकांपैकी ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी बंडखोरी अथा उमेदवारी मागे न घेणे म्हणजे समाजाशी गद्दारी असे समजले जाईल, असेही फर्मान काढले जात आहे. परिणामी इच्छुकांमध्ये सामंजस्याने आपल्यापैकीच एक असा सूर आळविला जात आहे.
इच्छुकांच्या संख्येत दिवसेंदिवस होतेय वाढराज्यातील सत्तानाट्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन दोन तुकडे झाले. त्यातून महायुती आणि महाविकास आघाडीत प्रत्येकी प्रमुख तीन घटक पक्ष झाले आहेत. या सर्वच पक्षाकडून इच्छुकांची दावेदारी आहे. त्यामुळे बंडखोरीचे प्रमाण वाढणार आहे. या बंडखोरांना तिसऱ्या परिवर्तन आघाडीबरोबरच आता मनोज जरांगे यांचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. बहुतांश जण जरांगेच्या दरबारात धाव घेत उमेदवारीची मागणी करत आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील जवळपास सर्वच मतदारसंघातील इच्छुकांचा समावेश आहे. राजकीय पक्षाकडून दावा करणारेही जरांगेच्या आश्रयाला पाेहोचले असून, यामध्ये काँग्रेस, भाजपसह उद्धवसेना, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील प्रमुख दावेदारांचा समावेश आहे.
उमेदवारीबाबत एकमत होईना, त्यांना समाज स्वीकारेल का?नांदेड हे चळवळीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी विविध सामाजिक चळवळी उभ्या राहिल्या आहेत. मराठा आरक्षण लढ्यातही नांदेड जिल्ह्यातील शेकडो जणांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे प्रत्येक मतदार संघात इच्छुकांचीही संख्या मोठी आहे. त्यात जरांगे फॅक्टरवर प्रत्येकालाच आमदार झाल्याचे स्वप्न पडत आहे. यामध्ये अनेकजण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतदेखील निवडून येण्यास पात्र नाहीत. त्यामुळे जरांगे हे इच्छुकांना एकत्र बसवून तुमच्यातून एकाचे नाव सुचवा, असे सांगत आहेत. पण, उमेदवारीबाबत इच्छुकांमध्येच एकमत होत नाहीय. त्यामुळे आमदारकीसाठी जरांगेंच्या जीवावर हाफाफलेल्यांना समाजतरी स्वीकारेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.