नांदेड- मोठ्या प्रमाणात विस्फोटके घेवून नांदेडकडे येत असलेल्या चार संशयित दहशतवाद्यांना हरियाणातील कर्नाल चेक पाेस्टवर पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे हे दहशतवादी नांदेडात मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते काय? किंवा नांदेडमार्गे इतर ठिकाणी हा शस्त्रसाठा नेणार होते. याबाबतचा तपास आता पोलिस करीत आहेत. त्यासाठी एक पथक हरियाणा येथे पाठविण्यात येणार आहे.
पंजाबची दहशतवादी संघटना बब्बर खालसाशी संबधित हे चार संशयित दहशतवादी आहेत. पाकीस्तानमध्ये लपलेल्या कुख्यात हरविंदरसिंघ रिंदा याच्या संपर्कात ते होते. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे गुरप्ती, अमनदीप, परमिंदर आणि भूमिंदर असल्याचे हरियाणा पोलिसांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षापूर्वी नांदेडात हरविंदरसिंघ रिंदा याची मोठी दहशत होती. पूर्व वैमनस्यातून त्याने नांदेडात अनेकांचे खूनही केले आहेत. त्याचबरोबर व्यापारी, डॉक्टर यासह अनेकांकडून जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळण्यात आली आहे.
रिंदा गेल्या काही वर्षापासून तो नांदेडात नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु, त्याच्या नावाने आजही नांदेडात खंडणी उकळण्याचे प्रकार सुरु आहेत. त्यात आता स्फोटकांचासाठा घेवून दहशतवादी नांदेडात येणार असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नांदेड पोलिस अलर्टवर आहेत. पकडलेल्या दहशतवाद्यांचे नांदेडात कोणाशी संबध होते काय? याची चौकशी करण्यात येत आहे. तसेच नांदेड पोलिसांचे पथकही हरियाणा येथे जाणार आहे.
हरियाणाला पथक पाठविलेरिंदाशी संबधित दहशतवाद्यांना हरियाणा पोलिसांनी पकडल्याची माहिती मिळाली आहे. त्याची नांदेडातील कोणाशी लिंक होती. याचा शोध घेण्यासाठी एक पथक हरियाणा येथे पाठवित आहोत. जिल्ह्यात पोलिस सतर्क असून नागरीकांनी अफवांना बळी पडू नये असे आवाहन पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी केले आहे.