विधानसभेची मोहीम फत्ते; आता काँग्रेसच्या अनेकांना भाजपाचे डोहाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 08:02 PM2024-12-03T20:02:05+5:302024-12-03T20:03:05+5:30
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेससह महाविकास आघाडीचा धुव्वा उडाल्याने काँग्रेसमधील अनेकांना स्थानिक स्वराज्य संस्थांची चिंता पडली आहे.
नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतरही त्यांचे समर्थक असलेल्या अनेकांनी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले होते. परंतु आता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेससह महाविकास आघाडीचा धुव्वा उडाल्याने काँग्रेसमधील अनेकांना स्थानिक स्वराज्य संस्थांची चिंता पडली आहे. त्यामुळे काही जणांनी भाजपाचे कमळ हाती धरण्याची तयारी केली आहे. तर काहीजण शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात. त्यामुळे विधानसभा निवडणुका आटोपताच काँग्रेसला अनेक छोटे-मोठे धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला होता. परंतु त्यावेळी चव्हाणांसोबत मोठे काही नेते वगळता आमदार, माजी आमदार, तसेच जिल्ह्यातील दिग्गज पदाधिकारी यांनी मात्र काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले होते. त्यावेळी काँग्रेसमधील अनेकांना ते चव्हाणांची बी टीम असल्याचा संशय होता. परंतु त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीत या मंडळींनी काँग्रेससाठी झोकून देत काम केले होते. त्यामुळे वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला नेतृत्व अन् बुस्टरही मिळाला होता. परिणामी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही चांगलेच बळ मिळाले होते. या विजयाच्या भरवशावरच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही बाजी मारता येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत हाेता. त्यामुळे काँग्रेसमध्ये इनकमिंगही वाढली होती. परंतु विधानसभा निवडणुकीचा कौल आला अन् काँग्रेस जणांचा भ्रमनिरास झाला. काँग्रेससह महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला. तर लोकसभा पोटनिवडणुकीत मात्र रवींद्र चव्हाण यांचा अल्प मतांनी विजय झाला. परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता दुसऱ्या फळीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मात्र चलबिचल सुरू झाली आहे. काही जणांनी भाजपात प्रवेशही केला आहे. तर अनेकजण पाइपमध्ये आहेत. येत्या काही दिवसात भाजपासह महायुती आघाडीत इनकमिंग वाढणार असल्याचे चित्र असून ही काँग्रेससाठी धाेक्याची घंटा आहे.
मोहीम फत्ते आता पक्षांतर
जिल्ह्यात काँग्रेसमध्ये असलेल्या अनेकांवर अशोकराव चव्हाण यांची बी टीम संबोधले जात होते. त्याबाबत चव्हाण यांनीही मिश्कीलपणे माझ्या सर्वच पक्षात ए. बी. सी. टीम आहेत, अशी टिप्पणी केली होती. आता विधानसभा निवडणुका आटोपताच काँग्रेसमधील अशोकराव समर्थकांनी भाजपात प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे.