मागील काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा मुद्दा चर्चेत आहे. नांदेडमध्येही पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. वाढत्या महागाईच्या या काळात ही इंधन दरवाढ डोकेदुखी ठरत असतानाच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो विभागातील सहायक लेखाधिकारी सतीश पंजाबराव देशमुख यांची ही घोडेस्वारीला परवानगी मिळण्याची लेखी मागणी चर्चेचा विषय ठरला नसता तर नवलच. कळमनुरी तालुक्यातील घोडे कामठा येथील मूळ रहिवासी असलेल्या देशमुख यांचे गाव एकेकाळी जातिवंत घोड्यांसाठी प्रसिद्ध होते. ३ मार्चला देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून घोडे खरेदीसाठीची लेखी परवानगी मागितली. मला पाठीच्या कण्याचा त्रास आहे. त्यामुळे दुचाकीवरून प्रवास करणे अवघड जात आहे. त्यामुळे घोडा खरेदी करण्याचे ठरविले असून घोड्यावर बसून विहीत वेळेत कार्यालयात येणे मला शक्य होईन. घोडा आणल्यास त्याला कार्यालयीन परिसरात बांधण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी रितसर केली होती. मात्र, व्हायरल झाल्यानंतर या पत्राची राज्यभर चर्चा झाली. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत देशमुख यांना बोलावून कार्यालयीन समज दिल्यानंतर घोड्यासाठीची मागणी मागे घेत देशमुख यांना बुधवारी सायंकाळी लेखी माफीनामा सादर करावा लागला.
चौकट -
डॉक्टर म्हणतात, मणक्याचा त्रास वाढतो
सहायक लेखाधिकारी सतीश देशमुख हे मणक्याचा त्रास असल्याने प्रवासासाठी घोडा वापरण्याची परवानगी मागत होते. यासंदर्भात अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ डॉ. राजेश अंबुलगेकर यांना विचारले असता, घोड्यावरून प्रवास केल्याने पाठीचा त्रास उलट वाढतो. पाठीतील मणके आणि डिस्क घोडसवारीमुळे दबतात. त्यामुळे कायमचे अपंगत्वही येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
चौकट
पाठदुखीमुळे मागणी मात्र इंधन दरवाढीची
सतीश देशमुख यांनी पाठीचा त्रास असल्याने घोडेसवारीची मागणी केली होती. मात्र, त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले हे पत्र व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या पत्राची सांगड वाढत्या इंधन दरवाढीशी घातली. पेट्रोल- डिझेलचे दर अवाक्याबाहेर गेल्याने नागरिक आता घोड्याकडे वळत आहे. त्यात देशमुख यांचे काय चुकले, असा प्रश्नही अनेकांनी समाजमाध्यमांवर केला आहे.