नांदेड अन् बारामतीच्या दादांमध्ये रात्री ‘चाय पे चर्चा’; राष्ट्रवादीत येण्याचे संकेत, वेळ कधीची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 20:06 IST2025-03-01T19:59:19+5:302025-03-01T20:06:39+5:30

बंद दाराआड जवळपास अर्धा तास झालेल्या ‘चाय पे चर्चे’तून पक्षप्रवेशाचा मार्ग सुकर झाल्याचे बाेलले जात आहे. 

at Night 'Chai Pe Charcha' between Dadas of Nanded Bhaskarrao Khatgaonkar and Ajit Pawar of Baramati; Signs of coming a big leader in NCP | नांदेड अन् बारामतीच्या दादांमध्ये रात्री ‘चाय पे चर्चा’; राष्ट्रवादीत येण्याचे संकेत, वेळ कधीची?

नांदेड अन् बारामतीच्या दादांमध्ये रात्री ‘चाय पे चर्चा’; राष्ट्रवादीत येण्याचे संकेत, वेळ कधीची?

नांदेड:  माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या निमंत्रणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्याकडे दुपारी चहाला जाणार होते. मात्र, ऐनवेळी अजितदादांचे नियोजन बदलले अन् ते कंधारहून थेट परभणीला गेले. त्यामुळे खतगावकर समर्थकांचा हिरमोड झाला होता. मात्र, ‘दादां’नी दिलेला शब्द पाळत शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास खतगावकर यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्याशी चर्चा केली. बंद दाराआड जवळपास अर्धा तास झालेल्या ‘चाय पे चर्चे’तून पक्षप्रवेशाचा मार्ग सुकर झाल्याचे बाेलले जात आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर स्थानिक पातळीवर सर्वच घटक पक्षांमध्ये पक्षप्रवेशावरून चढाओढ सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, नांदेडच्या राजकारणात दादा म्हणून ओळखले जाणारे भास्करराव खतगावकर हेदेखील काँग्रेसची साथ सोडून शिंदे सेनेत जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असता, खतगावकरांच्या घरी चहापानाला जाणार होते. त्यानुसार बाबानगर येथे जय्यत तयारीदेखील करण्यात आली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभा आटोपून ‘शिवमळा’मार्गे थेट मुंबई गाठली. त्यावेळी खतगावकर यांचे समर्थक नाराज झाले होते. त्यानंतर दादा काय निर्णय घेणार? आता शिवसेनेत जाणार की नवा पर्याय शोधणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. 

दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अन् खतगावकर यांच्यामध्ये फोनवर पक्ष प्रवेशाबाबत चर्चाही झाली होती. तटकरे यांनी दादांना दादासोबत येण्याचा आग्रह धरला होता. तद्नंतर शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी खतगावकर हे पक्षप्रवेश करतील, असा अंदाज बांधला जात होता. परंतु, तसे झाले नाही. मात्र, खतगावकर यांचे चहाचे निमंत्रण स्वीकारत अजितदादांनी बाबानगर येथील निवासस्थानी भेट दिली. त्यामुळे आता नांदेडचे दादा बारामतीच्या दादांसोबत जाणार असल्याचे बोलले जात आहे. या भेटीदरम्यान माजी मंत्री नवाब मलिक, आमदार विक्रम काळे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, दीपक सूर्यवंशी, अशोक पाटील आदींची उपस्थिती होती.

‘दादां’चे घड्याळ, पण वेळ कधीची?
रात्री उशिरा झालेल्या भेटीत नांदेडच्या अन् बारामतीच्या दादांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. भेटीनंतर अजित पवार यांनी माध्यमांना बोलणे टाळले. पण, भास्करराव खतगावकर यांनी व्यापक अन् सकारात्मक चर्चा झाल्याचे सूतोवाच करत घड्याळ हाती बांधणार असल्याचे संकेत दिले. तसेच चारही मतदार संघातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा करू आणि त्यानंतरच निर्णय घेऊ, असे खतगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

चिखलीकर, हंबर्डे अनुपस्थित!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शुक्रवारचा दौरा आमदार प्रतापराव चिखलीकर यांनीच घडवून आणला. पूर्वनियोजित नसताना दुपारी भास्करराव खतगावकर यांच्याकडे चहा घेण्याचेही चिखलीकर यांच्या सल्ल्याने ठरले. पण, ऐनवेळी दुपारची भेट रद्द झाली अन् रात्री परभणीवरून परत येताना दादांनी नांदेडच्या दादांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी आमदार प्रतापराव चिखलीकर, मोहन हंबर्डे हे अनुपस्थित होते. मात्र, उभय नेत्यांची दुसरी पिढी म्हणजेच प्रवीण चिखलीकर, राहुल हंबर्डे उपस्थित होते.

अन् दादा भडकले...!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री खतगावकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असे खतगावकर म्हणाले. मात्र वारंवार राजकीय भूमिका बदलत आहात? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, खतगावकर भडकले. या जिल्ह्यात अनेकांनी पक्ष बदलले, त्यांची नावे सांगू का? मी ४० वर्षे काँग्रेसमध्ये राहिलो. माझ्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मी निर्णय घेणार आहे, असे त्यांनी सांगितले. अजित पवार यांनी काही आश्वासन दिलं का? असं विचारल्यानंतर पुन्हा खतगावकर भडकले, मी सिनियर आहे, माझ्याकडे कुणीही येतं, अशोकरावदेखील येतात. तुम्ही पण येता, असे ते म्हणाले.

Web Title: at Night 'Chai Pe Charcha' between Dadas of Nanded Bhaskarrao Khatgaonkar and Ajit Pawar of Baramati; Signs of coming a big leader in NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.