नांदेड : भाजपा स्थापनेच्या दोन वर्षानंतर पक्ष वाढीसाठी माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांनी नांदेडमध्ये १९८२ मध्ये पहिली जाहीर सभा घेतली होती. पक्ष कार्यासाठी तत्कालीन भाजपा पदाधिकाऱ्यांनी तीन लाखांची थैलीही वाजपेयी यांना यावेळी भेट दिली होती.
भाजपाची स्थापना १९८० मध्ये झाल्यानंतर पक्षवाढीसाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी देशभर दौरे काढले होते. याच दौऱ्याअंतर्गत नांदेडमध्ये १९८२ मध्ये ते पहिल्यांदा आले होते. पक्षवाढीचे उद्दिष्ट्य ठेवून त्यांनी चिखलवाडी येथील उदासी मठ मैदानावर जाहीर सभाही घेतली. या सभेत तत्कालीन भाजपा पदाधिकाऱ्यांनी वाजपेयी यांना पक्ष कार्यासाठी तीन लाखांची आर्थिक मदतही केली होती. यामध्ये तत्कालीन आ. चंद्रकांत मस्की, गणपतराव राऊत आदींचा समावेश होता. पक्षवाढीसाठी त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र येत निष्ठेने काम करण्याचा सल्ला दिला होता.
सभेनंतर भाग्यनगर येथील डॉ. प्रभाकर पुरंदरे यांच्या निवासस्थांनी त्यांनी भोजन घेतले होते. डॉ. प्रभाकर पुरंदरे हे संघाचे कार्यकर्ते. त्यांचेही शिक्षणही लखनऊ येथे झाले होते. वाजपेयी यांचेही शिक्षण तेथेच झाल्याने त्या परिचयातून त्यांनी पुरंदरे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. यावेळी वेदप्रकाश गोयल यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मंजिरी पुरंदरे, अरुंधती पुरंदरे यांनी आदरातिथ्य केले होते.
१९९६ आणि १९९८ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी प्रचार केला होता. भाजपाचे उमेदवार धनाजीराव देशमुख यांच्या प्रचारासाठी त्यांनी नांदेडमध्ये सभा घेतल्या. यावेळी त्यांच्यासमवेत प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.