नांदेड - जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील शिवनी गावात किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्याला गंभीर स्वरुप मिळाल्याने हा बौद्ध समाजातील कुटुंबावर हल्ला असल्याचे सांगत, 23 फेब्रुवारी रोजी लोहा शहरात बंद पुकारण्यात आला होता. या घटनेचे महाराष्ट्रभर पडसाद उमटले होते. त्यानंतर, अनेक आंबेडकरवादी नेत्यांना या गावाला भेट दिली. केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनीही गावाला भेट देऊन पीडित कुटुंबीयांची विचारपूस केली. त्यानंतर, महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला.
येथील संदीप दुधमल हे शेतातून साइकलवर घरी येताना रस्त्यात गावातीलच दोघे मोटारसायकलवरुन घरी येताना त्यांनी संदीप दुधमलच्या सायकलला धडक मारली. त्यानंतर संदीपने त्यांच्याशी वाद घातला. त्यावेळी दोघांनी जातीय शिवीगाळ करून संदीपला मारहाण केली. एवढ्यावर न थांबता आरोपींनी संदीप दुधमलच्या घरी जाऊन आई, भाऊ,वडील, चुलता, चुलती, बहीण यांना घरात घुसून मारहाण केली. ही मारहाण सुरू असतानाच हे भांडण सोडवायला गेलेल्या गणेश येडकेच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खाली पाडण्यात आले. या घटनेनंतर गावात तणाव पसरला होता. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे हे फौजफाट्यासह गावात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी दोन्ही बाजूकडील मंडळींना शांततेच आवाहन केले. तसेच फरार असलेल्या इतर आरोपींच्या शोधासाठी पथके पाठविली आहेत. आज, रामदास आठवले यांनीही पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. ''नांदेड मधील लोहा तालुक्यातील शिवनी जामगा या गावात बौद्ध कुटुंबावर झालेल्या सामूहिक हल्ल्या प्रकरणी आज घटनास्थळी भेट देऊन पीडितांची भेट घेतली. महाराष्ट्रात दलितांवर वाढत असलेले हल्ले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थांबवावेत. त्यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार दलितांवरील हल्ले रोखण्यात अपयशी ठरले आहे.'', असे आठवले यांनी म्हटले. यासंदर्भात त्यांनी ट्विटही केले आहे.