नांदेड : मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लगेच मध्यस्थी करून आंदोलनकर्त्याना ताब्यात घेतले. यावेळी परिसरात चांगलीच धावपळ उडाली होती.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी नांदेडमध्ये छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय मूक निदर्शने करण्यात येणार आहेत. त्याच्या एक दिवस अगोदर छावाने हे आंदोलन केले. आजपर्यंत मराठा समाजाने आरक्षणासाठी ५८ मूक मोर्चे काढले. परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे छावाने ठोक मोर्चा सुरू केला आहे, त्या पार्श्वभूमीवर छावाने आंदोलन केले असल्याचे दशरथ कपाटे यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल टाकून घेतले होते. यावेळी प्रचंड घोषणा ही देण्यात आल्या.पोलिसांनी बळाचा वापर करत कार्यकर्त्याना आवरले.आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या छावाचे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.