नांदेड : संपादित जमिनीचा मोबदला देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला. पोलिसांनी वेळीच शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
नायगांव तालुक्यातील सोमठाणा, बाभूळगांव आणि हिप्परगा गावातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी साठवण तलावासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. त्यांना अद्याप याचा मोबदला मिळालेला नाही. वेळोवेळी निवेदने देऊन या शेतकऱ्यांनी मोबदल्याची मागणी केली. परंतु, शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. यामुळे संतप्त शेतकरी आज दुपारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनासाठी पोहचले. पेट्रोल आणि रॉकेल घेऊन शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट झाली. पोलिसांनी शेतकऱ्यांना वेळीच रोखत ताब्यात घेतले.