नांदेड : कोरोना काळात आर्थिक संकटांचा सामना करावा लागणाऱ्या महापालिकेला नव्या वर्षात २२५ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची प्रतीक्षा राहणार आहे. महापालिकेने राज्य शासनाकडे विशेष निधीची मागणी केली असून, यासाठीचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. याचबरोबर शहरातील अन्य विकासकामेही मार्गी लागतील, अशी माहिती आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली. मार्चपासून उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे महापालिकेला आर्थिक बाबींचा सामना करावा लागला. मनपा यंत्रणा तब्बल नऊ महिने कोरोनाशी लढण्यात व्यस्त होती. ऑक्टोबर अखेरीस कोरोनाचे संकट कमी झाले. त्यानंतर शहरातील इतर दैनंदिन कामांकडे महापालिकेला लक्ष देण्यास वेळ मिळाला. कोरोना संकटानंतर महापालिकेने आता करवसुलीला प्रारंभ केला आहे. या वसुलीला नागरिकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. प्रतिदिन २५ ते ५० लाखांपर्यंत वसुली केली जात आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडियमच्या आधुनिकीकरणाच्या कामानेही वेग घेतला आहे. दलित वस्तीच्या दोन वर्षात खर्च न झालेल्या तब्बल ३५ कोटींच्या निधीचा प्रश्नही मार्गी लागला आहे. या निधीतून होणाऱ्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा प्रकल्पही अंतिम टप्प्यात आला आहे. बॅनर फ्री सिटी करण्यासाठीही महापालिकेने पावले उचलली आहेत. शहरात लोकसहभागातून सुशोभिकरणाची कामेही हाती घेण्यात आली आहेत. जुना राज्य महामार्ग महापालिकेने पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित केला आहे. या रस्त्याचा विकासही बांधकाम विभागामार्फत होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या वर्षात शहरात विकासकामांना गती येईल, असा विश्वास आयुक्त डॉ. लहाने यांनी व्यक्त केला आहे.
नव्या वर्षात २२५ कोटींच्या प्रस्तावाकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:13 AM