नांदेड : गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे देवालये बंद आहेत. त्यामुळे देव आणि भक्तांची भेट दुरापास्त झाली. त्यात शेकडो वर्षाची परंपरा असलेली पंढरपूरची वारीही चुकली. परंतु मनातला भाव कमी तसूभरही कमी झाला नाही. मंगळवारी वारकऱ्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा म्हणजेच आषाढीचा सण. कोरोनामुळे मंदिरे बंद आहेत. परंतु अनेकांनी आषाढीच्या पूर्वसंध्येला कळसावर बसलेल्या विठूरायांचे मनोभावे दर्शन घेतले.
प्रशासनाने कोरोनाच्या संकटामुळे मंदिरे बंद ठेवली आहेत. परंतु आषाढीचा उत्सव असल्यामुळे सोमवारी शहरातील सर्व विठ्ठल-रुखमाईच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. एरव्ही वारीच्या काळात आणि आषाढीच्या पूर्वसंध्येला टाळ-मृदंग आणि श्रीहरीच्या गजराने दुमदुमणाऱ्या मंदिरात सोमवारी मात्र शुकशुकाट होता. मंदिर समितीच्या वतीने मंदिराची रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. मंगळवारी आषाढीनिमित्त पूजेसाठी फक्त पुजाऱ्यांना मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. इतर भाविकांसाठी मात्र मंदिरात प्रवेश बंद राहणार आहे. आषाढीच्या पूर्वसंध्येला मात्र अनेक भाविकांनी कळसाचे मनोभावे दर्शन घेऊन बा विठ्ठला.. कोरोनाचे संकट दूर कर, असे साकडे आपल्या लाडक्या विठूरायाला घातले.