लोकमत न्यूज नेटवर्क, आष्टा (जि.नांदेड) : माहूर तालुक्यातील पडसा या गावापासून जवळच असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील कवठा बाजार येथे पैनगंगा नदीपात्रात बुडून काकूसह त्यांच्या दोन चिमुकल्या पुतण्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. वाळू तस्करांवर कारवाईच्या मागणीसाठी नातेवाइकांनी २० तास मृतदेह जागेवरून उचलले नाहीत. अखेर आर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ एप्रिल रोजी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रतीक्षा प्रवीण चौधरी (३५), अक्षरा नीलेश चौधरी (१२) आणि आराध्या नीलेश चौधरी (११) अशी मृतांची नावे आहेत. पूजेतील निर्माल्य विसर्जन करण्यासाठी १३ एप्रिल रोजी प्रतीक्षा चौधरी त्यांच्या पुतण्या अक्षरा आणि आराध्या यांना घेऊन पैनगंगा नदीवर गेल्या होत्या. यावेळी इतर दोन महिलाही त्यांच्यासोबत होत्या. निर्माल्य विसर्जन करीत असताना एका चिमुकलीचा तोल जाऊन ती डोहात पडली. तिला वाचविण्यासाठी मदतीला धावलेली दुसरी मुलगीदेखील डोहात बुडत असल्याचे पाहून काकूने मदतीसाठी डोहात उडी घेतली आणि त्याही बुडाल्या. सोबत असलेल्या दोन महिलांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी नदीपात्राकडे धाव घेतली; परंतु तोपर्यंत मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आले.