नांदेड - औरंगजेबाच्या कबरीवर जाणे हे महाराष्ट्रातील कोणालाही न आवडण्यासारखे आहे. एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी या ठिकाणी गेले होते. या प्रकरणाची पोलीस आयुक्तांमार्फत चौकशी सुरू असून योग्य ती कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
गृहमंत्री वळसे पाटील शनिवारी नांदेडात आले होते. विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात परीक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांची बैठक घेवून कायदा व सुव्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर वळसे पाटील म्हणाले, परीक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी अपूर्ण आहेत त्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.परीक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी अपूर्ण आहेत त्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
पोलीस दलाला आणखी सक्षम करण्याबाबत काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. कर्नाल येथे पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा साथीदार हरविंदरसिंघ रिंदा सध्या पाकिस्तानात आहे. त्या ठिकाणाहून तो कारवाया करीत आहे. या प्रकरणात रिंदाच्या पाठीमागे केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा तसेच राज्य सरकारही लागले आहे. परंतु याप्रकरणात तपशीलात बोलणे योग्य ठरणार नाही. कर्नाल येथे पकडण्यात आलेले आरोपी चार दिवस नांदेड मुक्कामी होते. याबाबत स्थानिक पोलीस आणि एटीएस तपास करीत आहेत, अशी माहिती गृहमंत्री वळसे यांनी दिली.