नांदेड : बाराशे भक्तांना स्वखर्चाने नांदेड येथील जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घडवणारी यात्रा मुंबईतील एक उद्योगपती तथा समाजसेवी सरदार विक्रमसिंघ संधू यांनी घडवून आणली. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
नांदेड येथे येऊन श्री गुरू गोविंदसिंघजी महाराज यांच्या पावन भूमीत नवीन वर्षाचे स्वागत करावे, अशी मनोभावना अनेकांची असते. ती प्रत्येकाला साध्य करणे शक्य होत नाही, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत राहून समाजसेवा करणारे सरदार विक्रमसिंघ संधू यांनी पुढाकार घेतला आणि मुंबई ते नांदेड अशी सहल आयोजित केली. मुंबई व परिसरात राहणाऱ्या भाविकांना एकत्रित करून ते नांदेडला घेऊन आले. यात्रेत शीख समुदायासह सर्वच पंथातील मंडळींना सहभागी करून घेतले. सुमारे १२०० जण या सेवाभावी यात्रेत सहभागी झाले आहेत. संधू हे युरोप देशात मोठे हॉटेल व्यावसायिक आहेत. सामाजिक व आध्यत्मिक सेवेत त्यांना रस आहे म्हणून त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे, असे त्यांनी सांगितले. वर्षभरात दोन वेळा ही यात्रा गरजवंतांसाठी घडवून आणली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुद्वारा लंगर साहिबचे मौजुदा मुखी संत बाबा नरेंद्रसिंघजी व संत बाबा बलविंदरसिंघजी यांनी संधू यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना आशीर्वाद दिले. आज ते मुंबईला परत जात आहेत. यात्रा यशस्वी होण्यासाठी त्यांना इम्रान अंधेरीवाले, लतीफ चौहान, राफत हुसेन, जुबेर बलोच, मैनोद्दीन शेख, समीर दायतर यांनी सहकार्य केले आहे. सुमारे बाराशे लोकांचा संपूर्ण खर्च ते स्वतः करत आहेत. १२ बस व रेल्वेने ही दर्शन यात्रा त्यांनी आयोजित केली. त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत करत नानक साई फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी सत्कार केला.