नांदेड : महावितरणकडून लॉकडाऊन काळात ग्राहकांच्या माथी सरासरीच्या नावाखाली लाखो रुपयांची बिले मारण्यात आली आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यात परिमंडळाच्या असलेल्या थकबाकीचा आकडा ४ हजार ६९६ कोटी ८७ लाखांहून तब्बल ५ हजार ४२ कोटी ८७ लाखांवर पोहोचला आहे.
विशेष म्हणजे, लॉकडाऊनमध्ये व्यावसायिक, औद्योगिक वापर जवळपास तीन ते चार महिने कडेकोटपणे बंद असताना या आस्थापनांची बिलेही पूर्वीप्रमाणेच आहेत. महावितरणच्या या गोंधळामुळे अनेक जण शॉकमध्ये आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांचे कंबरडे मोडलेले असताना महावितरणच्या वाढीव वीज बिलाचे मीटर मात्र सुरूच आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिक, उद्योजकांना बसला आहे. लॉकडाऊनमध्ये एप्रिल ते जुलै महिन्यापर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद होते; परंतु या काळातही या आस्थापनांना हजारो रुपयांची बिले आकारण्यात आली. अगोदरच लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आलेल्या व्यावसायिक, उद्योजकांचे यामुळे धाबे दणाणले आहे.
जून महिन्यात महावितरणने ६५ हजार ५९७ ग्राहकांकडून परिमंडळात १५ कोटी ८९ लाख रुपये वसूल केले. मे महिन्यात ४७ हजार ८२ ग्राहकांकडून ९ कोटी ६३ लाख, एप्रिल महिन्यात ३५ हजार ४८२ ग्राहकांकडून ६ कोटी ५ लाख, जुलै महिन्यात १ लाख २० हजार ३८२ ग्राहकांकडून २७ कोटी ८ लाख रुपये, ऑगस्टमध्ये १ लाख ४१ हजार ५४५ ग्राहकांकडून २७ कोटी ४२ लाख, सप्टेंबर- २ लाख ४३ हजार १७४ ग्राहकांकडून ५४ कोटी ४२ लाख आणि ऑक्टोबर महिन्यात १ लाख ५६ हजार ग्राहकांकडून ३४ कोटी ७७ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तब्बल पाच महिन्यांत थकबाकीचा आकडा साडेतीनशे कोटींहून अधिकचा झाला आहे.
महावितरणने अनेक ठिकाणी अत्याधुनिक मीटर बसविले आहेत. त्यासाठी कार्यालयात मशीन बसविण्यात आल्या आहेत. या मशीनवर संबंधित मीटरचे रीडिंग येते असे सांगण्यात आले, तसेच ज्या भागात हे मीटर नाहीत, त्या ठिकाणी कर्मचारी येऊन रीडिंग घेतात. परंतु हे काम खाजगी कंपनीला दिले आहे. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मूडवरूनच रीडिंगचे आकडे ठरतात.
ग्राहकांना फुटला घामदर महिन्याला सरासरी चारशे ते पाचशे रुपयांचे वीज बिल येणाऱ्या ग्राहकाला २५ हजार ते एक लाखापर्यंतचे बिल देण्यात आले. काेरोनामुळे मेटाकुटीस आलेल्या ग्राहकांना बिलाचे आकडे पाहून घाम फुटत आहे.