नांदेड: धनेगाव परिसरातील गुरूकृपा ट्रेडींग कंपनीच्या मालकाची मुंबई येथील आर. एन. एक्सपोर्टरच्या मालकाने धनादेशाद्वारे फसवणूक करून जिवे मारण्याचीही धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात ८ मी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने कारवाई करत आरोपी आकाश राजनाथ यादव यास अवघ्या २४ तासात जेरबंद करून गजाआड केले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई येथील आर.एन. एक्सपोर्टरचे मालक आकाश यादवने ५ ते १९ जुलै २०२० या कालावधीमध्ये धनेगाव येथील गुरूकृपा ट्रेडींग कंपनीचे अंकुश माने यांना ७० टन हिरवी मिरचीची ऑर्डर दिली. यानंतर माने यांनी शेतकऱ्यांकडून तब्बल २१ लाख ८० हजार ६२९ रूपये किंमतीची ७० टन ९८१ किलो हिरवी मिरची विकत घेऊन आकाश यादवच्या ऑर्डरप्रमाणे नवी मुंबई येथे पाठवून दिली. दरम्यान, यादवने २१ लाख ८० हजार ६२९ रूपयांपैकी ८ लाख ९० हजार रूपये माने यांच्या बँक अकाऊंटवर जमा केले. मात्र, उर्वरित १२ लाख ९० हजार ६२९ रूपयांची रक्कम देण्याकरिता तो टाळाटाळ करू लागला. माने यांनी पैशांची मागणी केली असता यादवने बँकेचे सहा चेक दिले. मात्र, ते चेक बाऊन्स झाले.
यामुळे वैतागून माने यांनी मुंबई येथे जाऊन यादवला रक्कम मागितली. त्यावेळी यादवने त्यांना शिवीगाळ करून पैसे मागितल्यास हातपाय तोडण्याचीही धमकी दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्याची माहिती ठाणे अंमलदार तथा सहायक पोउपनि. डी.एन. मोरे खैरकेकर व मदतनीस महिला पो.कॉ. पूनम उदगिरे यांनी दिली. याप्रकरणी व्यापारी अंकुश दिगांबरराव माने (रा. धनेगाव, ता. जि. नांदेड) यांच्या तक्रारीच्याआधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात आरोपी आकाश राजनाथ यादव (रा. नवी मुंबई) याच्याविरुद्ध अखेर ८ मे रोजी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोउपनि. एन. बी. कुंडगिर व कर्मचारी श्यामसुंदर नागरगोजे अधिक तपास करीत आहेत
आरोपी यादवच्या आवळल्या मुसक्यासहायक पोउपनि. एन. बी. कुंडगिर, ना.पोकॉ. श्यामसुंदर नागरगोजे व पो. कॉ. शिवाजी पाटील यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकणाचा तपास करून आरोपी आकाश राजनाथ यादव (वय-३० वर्षे रा. नवी मुंबई) यास अवघ्या २४ तासांच्या आत जेरबंद केल्याची माहिती आहे. दरम्यान, यादव याच्या अटकेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस ठाणे अंमलदार ज्ञानोबा गिते यांनी सांगितले.