हदगाव : सरसेनापती नेताजी पालकर यांची प्रति शिवाजी म्हणून इतिहासात ओळख आहे. पण तामसा येथे ३५० वर्षांपूर्वीची समाधी आजही जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री व बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांचे या बाबीकडे लक्ष वेधले असता त्यांनी जीर्णोद्धाराचे आश्वासन दिले आहे.
नेताजींचे मूळचे गाव रायगड जिल्ह्यातील चौक. शिवाजी महाराजांनी त्यांना ६२ गावांतील जहांगिरी दिली होती. माहूरपासून पिंगळी तामसा गावचा समावेश त्यामध्ये होता. आजही त्यांचे नातेवाईक पिंगळी गावात वास्तव्य करतात. नेताजी पालकर यांची समाधी तामसा येथे नदीकाठी आहे. या समाधीचा जीर्णोद्धार झाला नाही की काय, असा प्रश्न शिव अनुयायांना पडतो. येणाऱ्या तरुण पिढीला नेताजींच्या कामगिरीचे कौतुक व इतिहास माहिती व्हावा यासाठी या समाधीचा जीर्णोद्धार आवश्यक आहे.
याच घराण्यातील गणपतराव पालकर हे आमदार असताना व जिल्ह्याचे तत्कालीन खासदार केशवराव धोंगडे यांनी शासन दरबारी प्रयत्न केला होता. तामसा येथील मूळचे राधेश्याम मोपलवार जिल्हाधिकारी असताना त्यांनी या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी पाठपुरावा केला; पण यश आले नाही.